
देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी यानी जागतिक स्तरावरील असलेली आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन देशाच्या जनतेला आवाहन केले की राष्ट्र हितासाठी काही गोष्टीचा त्याग करण्याची तयारी ठेवा.देशाच्या प्रमुखांनी केलेल्या या आवाहनाची कुणी चेष्टा केली तर कुणी त्याचे वेगवेगळ्या प्रकारे कृती करून मीडियातून फोटो झळकवून समर्थन केले. पंतप्रधानांच्या या आवाहनामध्ये जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस,पेट्रोल,खाण्याचे तेल,रासायनिक खते,सोने याबाबत काटकसर करून देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा विचार त्यानी बोलन दाखवला.
या घटनेमुळे मला माझ्या देशात होवून गेलेल्या अतिशय साधे,प्रामाणिक,कट्टर देशभक्त आणि काटकसरी पंतप्रधानांची प्रकर्षाने आठवण झाली.आजकाल या कलियुगात वाकून नमस्कार करावे व ज्यांचे स्मरण करावे असे महानुभाव दुर्मिळ झालेत.
लबहादूर शास्ञी,अतिशय प्रामाणिक, प्रखर देशभक्त, काटकसरीचा वस्तुपाठ,अत्यंत नम्र,पंतप्रधान पदावर असतानाही त्यांच्या बोलण्यात वा वागण्यात कधीही अहंकाराने स्पर्श केला नाही. त्यांच्या जीवनातील अनेक अशा घटना आहेत की ज्या प्रत्येक भारतीयांसाठी आणि विशेषत: राजकीय क्षेञात काम करणार्यांसाठी प्रेरक आहेत.आपण फक्त त्यांच्या नावाचा वापर राजकीय फायद्यासाठीच करतो.
लालबहादूर एकदा साड्या खरे करण्यासाठी एका कापड दुकानात गेले होते.दुकानदाराने त्याना ते पंतप्रधान असल्याने मोठ्या किमतीच्या जरीच्या साड्या दाखवल्या.त्यावर ते म्हणाले मला फक्त गरज भागवण्यासाठी कमीत कमी किमतीच्या साड्या दाखवा.दुकानदार म्हणाला ," आपण पंतप्रधान आहात,तुमच्या पदाला शोभेल अशाच साड्या दाखवल्या" यावर मा.लालबहादूर यानी दिलेले उत्तर फार उद्बोधक होते.ते म्हणाले ," मी पंतप्रधान असलो तरी माझी वैयक्तिक परिस्थिती बेताचीच आहे." असे सांगून त्यानी कमीत कमी किमतीच्या साड्यां खरेदी केल्या.
त्यांच्या देशभक्तीचा आणि स्वाभिमानाची अनेक पैलू देशाने अनुभवले आहेत.१९६५ मध्ये देशात तीव्र अन्नधान्य टंचाई होती त्यात अमेरिकेने भारताला गहू पुरवठा बंद करण्याची धमकी दिली.लालबहादूर हे खरोखरच बहादूर होते.ते डगमगले नाहीत.त्यानी देशाला आवाहन करण्यापूर्वी आपल्या कुटुंबाला आदेश दिला की,आजपासून आपण सगळ्यानी एकच वेळ जेवायचे.स्वतः आचरणात आणले आणि जेव्हा त्यानां खाञी पटली की मी आणि माझे कुटुंबिय हे करू शकतो तेव्हा मग देशाला उपदेश केला की,आठवड्यातून एकदा सगळ्या भारतीयानीं उपवास करावा.
शास्ञीजी वैयक्तिक आयुष्यात किंवा सार्वजनिक जीवनात अतिशय काटकसर करत असतं.सार्वजनिक पैशाचा किंवा साधनांचा वापर हा अतिशय काटेकोरपणे केला पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा.सरकारी मालमत्ता ही स्वतःची मालमत्ता नाही तो जनतेचा पैसा आहे याची त्याना जाणीव होती.आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या साबणाची शेवटची कपळी होईपर्यंत ते तो वापरायचे.
सरकारी गाडी किंवा इतर संसाधने ही आपल्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या कामासाठी मुळीच वापरायची नाहीत हा त्यांचा कटाक्ष होता.एकदा त्यांचा मुलगा सुनील शास्ञी याने सरकारी गाडी वापरली.हे जेव्हा त्यानां समजले तेव्हा त्यानी त्याला झापलं.जितके कि.मी.गाडी वापरली त्याचे पैसै त्यानी तातडीने सरकारी तिजोरीत जमा केले.आजच्या या लुटालूटीत अशी अपेक्षाच करणे कठीण.
एकदा पंतप्रधान असतानाचं मुलाच्या प्रवेशासाठी ते इतर पालकांसारखे रांगेत उभे होते.तेव्हा मुख्याध्यापकांनी त्याना ऑफिसमध्ये येण्याची विनंती केली.तेव्हा ते त्यानां म्हणाले ,मी पंतप्रधान म्हणून आलेलो नाही,माझ्या पाल्यांचा पालक म्हणून आलेलो आहे,त्यामुळे मला स्पेशल ट्रिटमेंटची गरज नाही.
तामिळनाडूत जेव्हा एकदा रेल्वे अपघात झाला तेव्हा ते रेल्वेमंञी होते.नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यानी तात्काळ राजीनामा दिला.नाहीतर भारताच्या संसदेत आणि अनेक राज्यांच्या विधानसभेत खंडणी ,बलात्कार ,खुनाचे गंभीर आरोप असलेले अनेकजण आज आमदार, खासदार ,मंञी म्हणून मिरवत आहेत. आजच्या राजकारणात " शास्ञी" होणे फारच कठीण आणि दुरापास्त आहे.नैतिक मूल्यांचे अधिष्ठान जपणारे शास्ञी पुन्हा होणे नाही.मा.पंतप्रधानानी जे काटकसरीचे आवाहन केले त्याला प्रतिसाद म्हणून काही देशभक्तानी जी कृती केली त्या तमाम देशभक्तांचे अभिनंदन..माञ शास्ञीजी सारख्या प्रामाणिक राष्ट्रभक्ताच्या जीवनातील एखादा तरी अंश आपल्या सार्वजनिक जीवनात घेण्याचा प्रयत्न करावा ही इच्छा.











