भविष्यात सिंधुदुर्गात चिपको आंदोलन

रिंग रोड, क्वाॅरी - क्रशर कोकण पोखरतोय | सरमळे गावात शंभर एकर जमीनीवर वृक्षतोड : डॉ. जयेंद्र परूळेकर
Edited by: विनायक गांवस
Published on: May 12, 2026 17:18 PM
views 31  views

सावंतवाडी : तापमान वाढत आहे, वृक्षतोड होत आहे तरीही प्रशासन ढिम्मच झाले आहे. राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गासाठी झाडांची कत्तल झाली. ती झाडं वृक्षारोपण करण्यात येणार होती त्याचे काय झालं ? हा जाब विचारण्याची वेळ आली आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात संजय सावंत (वनश्री फाउंडेशन, तिलारी) आणि पक्षीतज्ज्ञ भाग्यश्री परब (रानबांबूळी) यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा सत्कार जैवविविधता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमींकडून आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्यजीव आणि पक्षी संवर्धनाच्या दृष्टीने मोलाची मदत सदर नेमणूकीमुळे होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी संजय सावंत आणि भाग्यश्री परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ जयेंद्र परुळेकर, सुमेधा सावंत, सतिश लळीत, संदीप सावंत, सतीश देसाई, वनक्षेत्रपाल सुहास पाटील आदी उपस्थित होते. डॉ. परूळेकर म्हणाले, राज्यात महामार्गावर असलेल्या झाडांची कत्तल झाली पुन्हा ती लावली नाही तीच अवस्था झाराप ते पत्रादेवी आणि झाराप ते खारेपाटण या मुंबई गोवा महामार्गावरील कत्तल झालेल्या झाडांची आहे. आता जाब विचारला पाहिजे. जैवविविधता,वन संरक्षण व संवर्धन आणि वन्य जीव याबाबत आपण सजगता निर्माण केली आहे. सह्याद्री घाट अर्थात पश्चिम घाटाचे फार मोठे महत्त्व आहे. माधवराव गाडगीळ यांनी त्यांचे निरीक्षण वेळोवेळी मांडले आहे. डॉ. परूळेकर म्हणाले, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील जमिनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत. इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये वृक्षतोड होत आहे. सरमळे गावात शंभर एकर जमीनीवर वृक्षतोड झाली आहे.कोलझर, सासोली मधील वृक्षतोड झाली मात्र, कारवाई झाली नाही. इको सेन्सिटिव्ह झोन आणि न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवून टाकले जात आहेत. आता झाडांना देव देवता, संत यांची नावे देऊन वृक्षतोड थांबली पाहिजे म्हणून नवीन प्रयोग केला पाहिजे. महात्मा गांधी यांच्या विचारांचे स्मरण करून चिपको सारखं आंदोलन नजिकच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडू शकते. यावेळी मानद वन्यजीव रक्षक संजय सावंत यांनी तिलारी परिसरातील वाघ, किंग कोब्रा,वन मानव, दुर्मिळ साप असं वन्य जीव वैभव आहे. मात्र रिंग रोड, क्वाॅरी आणि क्रशर ही चिंतेची बाब आहे. लोक तिलारी धरण परिसरात रिंग रोड मागत होते तेव्हा अवघ्या पाच कोटी रुपये खर्चून बांधता आला असता पण गैरसोयीमुळे जमिनी मालकांनी जमिनी विक्री केल्यानंतर आता तोच रिंग रोड परप्रांतीयासाठी १४० कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. हा झाला तर सह्याद्रीच्या पट्ट्याला फुट पडणार आहे, अशी त्यांनी शक्यता व्यक्त केली.

पक्षीमित्र मानद वन्यजीव रक्षक भाग्यश्री परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरूवातीला २४७ पक्षांची नोंद झाली होती आज ती ४२८ पर्यंत पोहोचली आहे. पक्षी वैभव बहरत आहे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करुया. यावेळी वनक्षेत्रपाल सुहास पाटील, सतिश लळीत, सतिश देसाई, संदीप सावंत,काका भिसे, सुनील सावंत यांच्यासहित मान्यवरांनी शक्तीपीठ महामार्ग,पर्यावरण, पक्षी, वन्य प्राणी, क्वाॅरी आणि क्रशर बाबत भूमिका मांडली.