
सावंतवाडी : आंबोली घाटात मुख्य दरडीच्या ठिकाणी सुमारे बाराशे फूट खोल दरीत मृतदेह आढळला. राजाराम रघुनाथ कुडतरकर ( वय 31, रा. आंबोली गावठणवाडी ) असं मृताच नाव असून तो डंपर चालक आहे. डंपर शेजारी लावून त्याने उडी मारून आत्महत्या केली. वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे मानसिक संतुलन ठीक नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
रात्रभर हा डंपर घाटात उभा असल्याने डंपर मालक मायकल डिसोजा यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी ड्रोनद्वारे घाटात पाहणी केली असता चालकाचा मृतदेह सुमारे बाराशे फूट खोल दरीत आढळून आला. यानंतर सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमचे सदस्य उत्तम नार्वेकर, मायकल डिसोजा, प्रथमेश गावडे यांनी बाराशे फूट खोल दरीत उतरून मृतदेहवर बाहेर काढला. यावेळी रेस्क्यू टीमचे सदस्य राजु राऊळ, राकेश अमृस्कर, दिपक मेस्त्री, फास्कू देसा, गुरु सावंत, संतान अल्मेडा, सहदेव सनाम, अमरेश गावडे, रमेश मोहीते यांनी मृतदेह दरीतून बाहेर काढण्यास मदत केली. दरम्यान, काही दिवसापासून डंपर चालकाचे मानसिक संतुलन ठीक नव्हते. वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे तो त्रस्त होता. काल पत्नीच्या माहेरी गेल्यानंतर येताना त्याने घाटात डंपर लावून दरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. अधिक तपास पोलिस करत आहेत. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटस्थळी भेट दिली. आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार मनिष शिंदे व पोलिस घटनास्थळी उपस्थित होते.

एक रात्र डंपर घाटात उभा असल्याने डंपर मालक मायकल डिसोजा यांना संशय आल्याने त्यांनी ड्रोनद्वारे घाटात पाहणी केली. यावेळी त्या चालकाचा मृतदेह सुमारे बाराशे फूट खोल दरीत आढळून आला.










