
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी 'पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे' भूमिपूजन येत्या १७ मे ला दुपारी ४ वाजता सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.
या गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजनानंतर सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवन येथे पत्रकारांचे जिल्हास्तरीय स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्यात पत्रकारांच्या कौटुंबिक यशाचाही सन्मान केला जाणार आहे. १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष गुणगौरव करण्यात येणार आहे. ज्या पत्रकारांचे पाल्य उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी आपली नावे त्वरित जिल्हा संघाकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी 'विविध गुणदर्शन' कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकारांसह त्यांच्या पत्नी आणि मुलांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. कला सादरीकरणासाठी इच्छुकांनी आपली नावे आगाऊ कळवणे आवश्यक आहे. या दोन्ही कार्यक्रमामध्ये जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.










