खासगी क्रशरसाठी ११ केव्ही लाईन

महावितरणकडून एवढी का झाली मेहरबान..? | ग्रामसभेने हाणून पाडला डाव
Edited by: विनायक गांवस
Published on: May 12, 2026 17:23 PM
views 59  views

सावंतवाडी : ग्रामपंचायत प्रशासन किंवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता एका खासगी क्रशरसाठी वीज वितरण कंपनीकडून सोनुर्ली गावातून ११ केव्ही विद्युत लाईन टाकण्याचे काम मनमानी पद्धतीने ठेकेदाराकडून सुरू आहे. हे काम संबंधित विभागाने त्वरित थांबवावे. अन्यथा, गावाच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा आक्रमक पवित्रा सोमवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत घेत ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय वीज वितरण कंपनीने हे काम करु नये असा एकमुखी ठरावही घेण्यात आला.

सोनुर्ली ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा सरपंच नारायण हिराप यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. यावेळी उपसरपंच भरत गावकर उपस्थित होते. या ग्रामसभेत अकरा केव्ही विद्युत लाईन टाकण्याच्या कामाचा मुद्दा ग्रामसभेत चांगलाच गाजला. सोनुर्ली गावातून एका खाजगी क्रशरला वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून अकरा केव्ही विद्युत लाईन टाकण्याचे काम सुरु असून याला ग्रामस्थांनी सुरुवातीपासून विरोध दर्शवूनही त्या ठिकाणी मनमानी पद्धतीने काम सुरू आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला सुद्धा याबाबत कोणत्याही प्रकारची कल्पना किंवा ना हरकत दाखला न घेता हे काम सुरू असल्याचे चर्चेतून ग्रामसभेत समोर आले. जर ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेता हे काम मनमानी पद्धतीने सुरू आहे तर या कामाला ग्रामस्थ म्हणून सर्वांनी एकजुटीने विरोध दर्शवण्याचा निर्णय सर्वांनी उचलून धरला. मुळात या लाईनचा गावाला कोणत्याही प्रकारे फायदा नसून ज्या जमिनीतून किंवा रस्त्याच्या बाजूने ही लाईन जाणार आहे त्या परिसरातील सर्व जमीन या लाईनमुळे धोक्यात येणार आहे. लाईनच्या आजूबाजूला ग्रामस्थांची शेतजमीन असून त्या ठिकाणी ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. यामुळे या लाईनचा भविष्यात ग्रामस्थांच्या जीवितासह धोका आहे. त्यामुळे विद्युत लाईन कुठल्या प्रकारे गावातून जाता कामा नये असा एकमुखी निर्णय यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी घेतला.

मुळात या चुकीच्या कामाला ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवातीपासून वीज वितरण कंपनी तसेच जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत लेखी स्वरुपात पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु, अद्याप एकही उत्तर संबंधित विभागाकडून आपल्याला आले नसल्याचे सांगण्यात आले. तर वीज अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या परवानगीनेच हे काम केले जाईल असेही स्पष्ट केले असतांनाही हे काम पूर्ण करण्याचा घाट घातला जात आहे. यावरून यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप काहींनी केला. गावाच्या हितासाठी कुठलाही राजकीय हस्तक्षेप खपवून न घेता सर्वांनी गावाच्या हितासाठी एकजुटीने या कामाला विरोध दर्शवू असा निर्णयही उपस्थितांनी केला. संबधित ठेकेदार सदरच्या कामाला बांधकाम विभागाची परवानगी असल्याचे सांगत आहे. मात्र, भविष्यात जीवित हानी झाल्यास याला बांधकाम विभाग जबाबदार राहणार आहे का ? असा सवालही उपस्थित करण्यात आला. दरम्यान या संदर्भात बांधकाम विभागासह विज विज वितरण कंपनी,जिल्हाधिकारी पालकमंत्री,आमदार ,पोलीस प्रशासन या सर्वांना लेखी पत्रव्यवहार करून ही विद्युत लाईन टाकण्याचे काम मनमानी पद्धतीने झाल्यास गावाकडून एकजुटीने विरोध दर्शवण्यात येईल असा निर्णय घेत तसा ठराव एकमताने पारित करण्यात आला.