
सिंधुदुर्गनगरी : श्री देवी महालक्ष्मीच्या शिखर कलश वर्धापन दिनानिमित्त रविवार, दिनांक ३ मे २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटी, चारबारा गावकर मंडळी, बहुमानकरी तसेच नारूर ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ६.३० वाजता देवतांना प्रार्थना करून नवचंडी अनुष्ठानाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता उपदैवताची महापूजा पार पडेल. सकाळी ९ वाजता श्री देवी महालक्ष्मीची सालंकृत महापूजा, ओटी भरणे, नवस बोलणे व नवस फेडणे या सेवा होतील.
सकाळी १० वाजता भाविकांसाठी कुंकू मार्जन सेवा तसेच सत्य अंबा पूजा (यजमान तेली) आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १२.३० वाजता बलीदान, पूर्णाहुती, नैवेद्य व महाआरती होईल. दुपारी १.३० वाजता गजानन तेली व प्रभाकर तेली (तिस्क, उसगाव-गोवा) यांच्या यजमानपदाखाली महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत स्थानिक भजनांचा कार्यक्रम रंगणार आहे. सायंकाळी ७ वाजता महाआरती होऊन रात्री ९ वाजता श्री देवी महालक्ष्मीचा पालखी सोहळा भक्तिभावात पार पडणार आहे. तसेच रात्री १० वाजता श्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











