
कुडाळ : राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक बांधिलकी जपणे हे महत्त्वाचे असते. 'चला कुडाळ घडवूया' या उपक्रमाच्या माध्यमातून मंदार शिरसाट यांनी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आणि शैक्षणिक उपक्रम राबवून आपली ही बांधिलकी सार्थकी लावली आहे, असे प्रतिपादन माहीमचे आमदार महेश सावंत यांनी केले.
कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या पटांगणावर मंदार शिरसाट यांच्या 'चला कुडाळ घडवूया' उपक्रमांतर्गत 'आकाश दर्शन व खगोलशास्त्र करियर संधी' या कार्यक्रमाचे शनिवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सावंत बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि आमदार महेश सावंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. यावेळी दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला. याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, अनिल कुलकर्णी, राजन नाईक, बबन बोभाटे, अमरसेन सावंत, अवधूत मालंडकर, संतोष शिरसाट, मनोज वालावलकर, आयोजक मंदार शिरसाट, सुशील चिंदरकर आणि शाळेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होणे गरजेचे : आ. महेश सावंत
आगामी काळात विज्ञानाच्या क्षेत्रात करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मुलांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम मंदार शिरसाट यांनी या उपक्रमाद्वारे केले आहे, असे सांगत आमदार महेश सावंत यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. माजी आमदार वैभव नाईक आणि नगराध्यक्ष संदेश पारकर यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला चालना देणारा हा उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात खगोल तज्ञ तथा विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे आणि त्यांच्या टीमने स्लाईड शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतात अंतराळवीर बनण्याच्या संधी आणि खगोलशास्त्रातील करियर यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर, उपस्थित ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी तीन दुर्बिणींच्या साहाय्याने चंद्राचे आणि इतर ग्रहांचे थेट दर्शन घेतले. लेझर शोच्या माध्यमातून राशी, नक्षत्रे आणि ताऱ्यांची ओळख करून दिल्याने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेला 'चांदोबाचा सेल्फी पॉईंट' बच्चे कंपनीसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले. विद्यार्थी, पालक आणि खगोलप्रेमी नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.










