
सावंतवाडी : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून शहरात पाणी साचून लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी कंबर कसली आहे. शहरातील सर्व नाले आणि गटारांची पावसाळ्यापूर्वी तातडीने स्वच्छता करण्यासाठी त्यांनी आज आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कडक शब्दांत निर्देश दिले आहेत. तसेच गॅस आणि वॉटर पाईपलाईन कंत्राटदारांना देखील दणका दिला. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करू असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या अडथळ्यांवरही चर्चा करण्यात आली. शहरातील अनेक भागांत वॉटर पाईपलाईन आणि गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे खोदलेली माती आणि ढिगारे अनेक ठिकाणी थेट गटारात साचल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. याची गंभीर दखल घेत नगराध्यक्षांनी संबंधित दोन्ही कंत्राटदारांना तातडीने आदेश दिले आहेत. ज्या ज्या ठिकाणी पाईपलाईनच्या कामामुळे गटारे मातीने भरली आहेत, ती स्वखर्चाने त्वरित साफ करावीत. ते नाल्यात न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावावी. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्यात येईल असाही इशारा त्यांनी दिला. तसेच शहरातील मुख्य नाले आणि अंतर्गत ड्रेनेज लाईनची साफसफाई युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा वेगाने व्हावा आणि रोगराई पसरू नये, यासाठी आरोग्य विभागाने प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरातील नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, ही आमची प्राथमिकता आहे. पाईपलाईन टाकणाऱ्या कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे जर गटारे तुंबली असतील, तर ती साफ करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. यात कोणतीही टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. या बैठकीस न.प.चे अधिकारी, कर्मचारी, गॅस व नळपाणी कामाचे ठेकेदार उपस्थित होते.










