न. प. सभेत सत्ताधारी - विरोधकांत जोरदार खडाजंगी !

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 24, 2026 15:43 PM
views 58  views

सावंतवाडी : शहरातील सुवर्ण कॉलनी येथील जागा हस्‍तांतरण करण्याचा ठराव घेण्यावरुन नगरपालिकेच्या सभेत गटनेते खेमराज‌ उर्फ बाबू कुडतरकर व सत्‍ताधारी नगरसेवक यांच्यात खडाजंगी उडाली. मागील दोन सभेमध्ये मागणी करुनही ठराव घेण्यात आला नाही अशी टिका करत आमचे प्रश्न आणि कामे जाणूनबुजून घेतली जात नाहीत असा आरोप करत जोपर्यंत ठराव घेतला जात नाही, तोपर्यंत सभा सुरु करु देणार नाही असा आक्रमक पवित्रा श्री. कुडतरकर यांनी घेतला. या विषयावरुन सत्‍ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये बरीच तूतू-मैमै झाली. अखेर नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोंसले यांनी हस्‍तक्षेप करत आपण याबाबत लेखी द्या, लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

सावंतवाडी न.प.ची सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगराध्यक्षा श्रध्दाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर, मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्‍थित होते. सभेच्या सुरुवातीलाच विषयांचे वाचन सुरु असताना विरोधी गटनेते बाबू कुडतरकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मागील दोन सभेत आपण ठराव मांडल्‍याप्रमाणे माझ्या प्रभागातील सुवर्ण कॉलनी येथील सभागृहासाठी नमो उद्यान व सुशोभिकरण करण्याकरीता ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या जागेचे मालक हयात नसल्‍याने जागेची  हस्‍तांतरण प्रक्रिया रखडली आहे. त्‍याचे काय झाले ?नगरपालिकेत प्रशासक असणा–या तत्‍कालीन प्रांताधिकारी यांनी निधी मंजूर असून देखील हा प्रस्‍ताव फेटाळला होता, असे सांगत  हा मुद्‌दा उचलून धरला. त्‍यावर नगराध्यक्षा यांनी आपण पत्र द्या, त्‍यावर निर्णय घेऊ  असे सांगितले. दरम्‍यान, मागील सलग दोन सर्वसाधारण सभेत मी ठराव मांडला आहे. पत्र देण्याची गरज वाटत नाही, यावर तातडीने ठराव घ्‍या. अन्यथा, सभा सुरु करु देणार नाही असा पवित्रा घेतला. त्‍यात नगरसेविका ॲड.निता कविटकर यांनी उडी घेत हा विषय मागील दोन बैठकांपसून सुरु आहे‌. त्‍यावर याच बैठकीत निर्णय झाला पाहिजे. तत्‍कालीन नगराध्यक्ष कोणी तरी होते त्‍यांनी कोणताही निर्णय घेतला नाही असे सांगताच  सत्‍ताधारी नगरसेवक खवळले. कोणी तरी या शब्‍दाला आक्षेप घेत नगरसेवक सुधीर आडिवरेकर,आनंद नेवगी,निलम नाईक,ॲड.सिध्दार्थ भांबुरे,प्रतीक बांदेकर विरोधकांवर तुटून पडत त्‍यांनी एकच गदारोळ केला. कोण तरी म्‍हणजे कोण ? ते पदसिध्द उपनगराध्यक्ष आहेत‌. त्‍यांच्या पदाचा मान ठेवा असे खडेबोल सुनावले. नगरसेवक आनंद नेवगी यांनी उभे राहत विरोधी नगरसेविका निता कविटकर यांना त्‍यांचे नाव घ्‍या असे सांगितले. त्‍यावर नगराध्यक्षा यांनी आपण इथे विकासाची चर्चा करायला आलो आहोत, वाद घालायला नाही. त्‍यामुळे सर्वांचा आदर करुन बोला असे निर्देश दिले. यावेळी गटनेते बाबू कुडतरकर यांनी आपण त्‍या जागेसाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. काही कामे निधीतून झाली आहेत. आता निधी मंजूर करुनही जर ती जागा नावावर नाही झाली आणि प्रस्‍ताव फेटाळले तर आम्‍ही विकासकामे कशी करायची ? असा सवाल केला.यावर 

सत्‍ताधारी नगरसेवक भांबुरे यांनी अध्यक्ष यांनी निर्णय घ्‍यावा. अन्यथा हा विषय पुढील मिटींमध्ये ठेवावा अशी सुचना केली. त्‍यावर विरोधी गटाचे नगरसेवक गोंदावळे यांनी यावर याच बैठकीत निर्णय झाला पाहिजे असे सांगितले. त्‍यावर नगराध्यक्षा यांनी मी ऐकून घेतले आहे. पत्र द्या निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. 

दरम्यान, सावंतवाडी शहराच्या हद्‌दीतील मोबाईल टॉवर्सच्या कर आकारणी पोटी ८ लाख ४८ हजार ४३ रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मागील व चालू कराची आकारणी असून ती तातडीने वसूल केली जावी. अन्यथा, नगरपालिकेचे नुकसान होईल असे नगरसेवक प्रतीक बांदेकर यांनी सांगितले.  तर शहरात गॅस व नळपाणी पाईपलाईनसाठी रस्‍ते खोदाई करण्यात आली असून काही ठिकाणी कामे पूर्ण झाली तरी अद्याप तेथील डांबरीकरण झालेले नाही. ही कामे कधी करणार ? पावसाळा जवळ आला असा सवाल गटनेते श्री. कुडतरकर यांनी उपस्‍थित केला.‌ यावर येत्या १५ दिवसांत कार्यवाही होईल असं आश्वासन नगराध्यक्षांनी दिले. यावेळी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, निलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, वीणा जाधव, बाबु कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, ॲड. निता सावंत-कविटकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, तौकीर शेख आदी उपस्थित होते.