तालुक्यातील गावांनाही वादळी वाऱ्या-पावसाचा फटका

Edited by: विनायक गांवस
Published on: April 24, 2026 15:39 PM
views 33  views

सावंतवाडी : तालुक्यात झालेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टी आणि वादळामुळे वेर्ले आणि देवसु परिसरात अनेक घरांचे तसेच मांगराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.  वेर्ले गावात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. वेर्ले-देऊळवाडी येथील रहिवासी सुरेश आत्माराम नाईक यांच्या राहत्या घराच्या छताचे अतिवृष्टी आणि वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले. या आपत्तीत त्यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच वेर्ले-फौजदारवाडी येथील अर्जुन रामा सावंत यांच्या मांगराचेही छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेल्याने नुकसान झाले आहे. या नुकसानीची अंदाजे रक्कम २० हजार रुपये आहे. ऐन पावसाच्या सुरुवातीलाच छताचे नुकसान झाल्याने या कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. देवसु परिसरातही चक्रीवादळाचा तडाखा बसला. येथील मंगेश धोंडी परब यांच्या राहत्या घरावर मोठे झाड उन्मळून पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. या घटनेत अंदाजे ५,६०० रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शिरशिंगे परिसरात मेघगर्जना

शिरशिंगे परिसरातही ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. पावसामुळे परिसरातील तापमानात घट झाली असली तरी, वादळी वाऱ्याने शेतकरी आणि ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.