
सावंतवाडी : धवडकी ते सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे, शिवापूर या मुख्य राज्यमार्ग १९० च्या रुंदीकरणाचे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले असून भविष्यात हा मार्ग मुंबई-गोवा आणि कोल्हापूरला जोडणारा पर्यटनाचा प्रमुख केंद्रबिंदू ठरणार आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून आणि सुमारे दोन कोटी ७० लाख रुपये खर्चून या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून याचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. परब म्हणाले की, "सह्याद्री पट्ट्यातील दुर्गम गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या दर्जेदार कामामुळे आता या भागातील नागरिक अवघ्या अर्ध्या तासात सावंतवाडी शहरात पोहोचू शकणार आहेत. लवकरच सांगेली ते शिरशिंगे-कलंबिस्त या पुढील टप्प्याचे कामही हाती घेतले जाईल. हा मार्ग केवळ स्थानिक वाहतुकीसाठी मर्यादित न राहता, तो कोल्हापूर आणि मुंबईला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरेल. उपतालुकाप्रमुख जीवन लाड यांनी सुचवले की, पारगड मार्गे शिरशिंगे-कलंबिस्त असा मार्ग कोल्हापूरला जोडण्यासाठी विशेष समिती गठीत करून पाठपुरावा केला जाईल. यामुळे या भागातील पर्यटन आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. या कार्यक्रमादरम्यान रस्ते कामासाठी सहकार्य करणारे जमीन मालक रमेश नाईक व वामन नार्वेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन संजू परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, जिल्हाप्रमुख संजू परब यांचा सत्कार उपतालुकाप्रमुख जीवन लाड यांनी केला.यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, उपतालुकाप्रमुख जीवन लाड, वामन नार्वेकर, उपसरपंच सुरेश पास्ते, संतोष नार्वेकर, दीपक सांगेलकर, अभय किनळोस्कर, उपविभाग प्रमुख संजय पालकर, ओबीसी तालुकाप्रमुख वासुदेव होडावडेकर, अमित चव्हाण, प्रकाश सावंत, गणपत राणे, मुख्याध्यापक रामचंद्र घावरे, चंद्रकांत राणे, चेतन सावंत, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पास्ते, सचिन नार्वेकर यांसह अनेक शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










