विजयकुमार कदम यांच्याकडून शाळेला भरीव आर्थिक मदत

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 21, 2026 20:18 PM
views 33  views

देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल येथील शिरगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी व प्राचार्य म्हणून कार्य केलेले विजयकुमार सखाराम कदम सर आणि त्यांच्या पत्नी सौ.सुप्रिया विजयकुमार कदम मॅडम यांनी कै.अण्णा साहेब (आ. सी.) कदम यांच्या पवित्र स्मरणार्थ शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी तब्बल ₹१,५१,०००/- इतकी उदार देणगी प्रदान केली.कदम यांच्याकडून हा धनादेश शाळा समितीकडे यावेळी सुपूर्त करण्यात आला आहे.

शाळा म्हणजे केवळ चार भिंती नव्हेत, तर ती आयुष्य घडवणारी एक संस्कारशाळा असते.या संस्कारांच्या पायावर उभे राहून जेव्हा एखादा विद्यार्थी मोठा होतो आणि पुन्हा आपल्या शाळेसाठी काहीतरी देण्याचा विचार करतो, तेव्हा त्या क्षणाला एक वेगळीच उंची प्राप्त होते.या देणगीतून शाळेतील एक वर्ग नूतनीकरण करण्यात येणार असून,या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या व सुसज्ज वातावरणात शिक्षण घेतायेणारआहे.आजच्या काळात आपण अनेकदा ऐकतो की लोक आपल्या मूळाशी नाळ तोडून पुढे जातात.मात्र कदम सरांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले की,माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या आयुष्याची पायाभरणी ज्या ठिकाणी झाली,त्या ठिकाणाचे ऋण फेडणे हीच खरी कृतज्ञता असते.त्यांची ही देणगी केवळ आर्थिक मदत नसून,ती एक भावनिक नाळ जपणारी कृती आहे.त्यांनी२१ एप्रिल २०२६ रोजी शाळा समितीकडे हा धनादेश औपचारिकरित्या सुपूर्त करण्यात आला.या प्रसंगी मुंबई कमिटी सदस्य अमित साटम, मानद अधीक्षक संदीप साटम, शाळा समिती सदस्य दिनेश साटम, मंगेश लोके, शिक्षक प्रतिनिधी हेमंत सावंत सर तसेच ज्येष्ठ शिक्षक उदयसिंग रावरणे सर उपस्थित होते.या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत साधेपणाने पण भावनिक वातावरणात पार पडला.

कदम सर हे केवळ एक माजी विद्यार्थी किंवा प्राचार्य नाहीत, तर ते एक आदर्श शिक्षक, मार्गदर्शक आणि समाजप्रेमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कृतीतून इतर माजी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे निश्चितच इतर माजी विद्यार्थीही पुढे येऊन आपल्या शाळेसाठी योगदान देतील, अशी आशा व्यक्त होत आहे.आजच्या युगात, जिथे अनेक गोष्टी पैशाच्या तोलामोलावर मोजल्या जातात, तिथे अशी देणगी म्हणजे केवळ रक्कम नसून ती एक भावना आहे आपल्या शाळेबद्दलची,आपल्या गुरुजनांबद्दलची आणि आपल्या गावाबद्दलची.शिरगाव हायस्कूलच्या या नूतनीकरण उपक्रमाला मिळालेली ही साथ म्हणजे केवळ एक वर्ग नव्याने उभा राहणार नाही, तर त्यातून अनेक विद्यार्थ्यांची स्वप्नेही नव्याने आकार घेणार आहेत.