
कुडाळ : कुडाळ शहरातील कवील काटे परिसरातील भंगसाळ नदीपात्रात मंगळवारी सायंकाळी पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वैभव नितीन बांदेकर असे या मृत तरुणाचे नाव आहे. नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या वैभवचा असा अकस्मात मृत्यू झाल्याने कुडाळ शहरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी वैभव आपल्या चार मित्रांसोबत भंगसाळ नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. चौघेही तरुण नदीपात्रात उतरले असता, त्यातील दोघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून ते बुडू लागले. ही परिस्थिती पाहून उपस्थित मित्रांनी आरडाओरडा करत तातडीने मदतीसाठी धाव घेतली. यामध्ये एका मित्राला वाचवण्यात यश आले, मात्र वैभव खोल पाण्यात गेल्याने तो मित्रांच्या हाताला लागला नाही.
नागरिकांची धाव, मृतदेह ताब्यात
ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरताच स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने नदीकाठी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने वैभवचा शोध घेण्यात आला असता, त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी (पोस्टमार्टम) कुडाळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.
शहर परिसरात हळहळ
वैभवने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. आपल्या मुलाचे भवितव्य पाहण्यासाठी डोळ्यात स्वप्ने साठवलेल्या पालकांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खेळत्या वयातच वैभवच्या जाण्याने कुडाळ शहर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.










