
सिंधुदुर्गनगरी : राज्यभरातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे, तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. काही कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला असला तरी अनेक ठिकाणी कामकाज सुरूच राहिले. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये नागरिकांसह कर्मचाऱ्यांची वर्दळ कायम होती. विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात टळल्याचे दिसून आले. महसूल विभागातील एकूण ६५८ अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी ४८३ जणांनी संपात सहभाग नोंदविला. तर १४२ अधिकारी-कर्मचारी नियमित कामावर हजर होते. याशिवाय ३३ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर होते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
एकूणच, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या या संपाचा काही विभागांवर परिणाम झाला असला तरी अनेक कार्यालयांमध्ये कामकाज सुरू राहिल्याने संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले.










