
सावंतवाडी : निरवडे गावचे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक तथा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी तब्बल १३ वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर 'कथा कुणाची व्यथा कुणाला' या नाटकाद्वारे रंगभूमीवर यशस्वी पुनरागमन केले आहे. श्री देव भूतनाथ देवस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सामाजिक नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रमोद गावडे यांनी केवळ मुख्य भूमिकाच साकारली नाही, तर त्यांच्या दिग्दर्शनाखाली स्थानिक कलाकारांनी व्यावसायिक दर्जाचा अभिनय सादर केला. कीर्ती चव्हाण, प्राजक्ता मोरजकर, अभिषेक मेस्त्री, विलास गावडे यांच्यासह निरवडेतील अनेक तरुण व अनुभवी कलाकारांनी आपल्या अचूक संवादफेकीने आणि पाठांतराने प्रेक्षकांची मने जिंकली. नाटकाला उमाकांत गावडे (हार्मोनियम) व रोहन गावडे (पखवाज) यांची संगीत साथ लाभली. तर प्रकाश योजना आणि नेपथ्याची बाजूही भक्कम होती. सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या प्रमोद गावडे यांनी या नाटकाद्वारे नव्या पिढीसमोर अभिनयाचा एक आदर्श वस्तुपाठ सादर केला. १९ एप्रिल रोजी रंगलेल्या या प्रयोगाने निरवडेचा रंगमंच पुन्हा एकदा उजळून निघाला असून सर्व स्तरांतून कलाकारांचे कौतुक होत आहे.










