
सावंतवाडी : महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून तीन महिने होऊन देखील रस्ते सुस्थितीत न केल्याने नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेत काम बंद पाडले होते. आधी रस्ते सुस्थितीत आणा, नंतरच पुढचं काम करा असा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर आज सकाळपासून गॅस कंपनीकडून या दुरूस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
पावसाळा जवळ येत असल्याने खोदाकामामुळे बूजलेले गटार पूर्ववत करण्यासह रस्त्यावर असलेला मातीचा ढीग रस्त्याच्या समांतर करण्याची मागणी श्री. सुर्याजी यांनी केली होती. तसेच गॅस लाईनचे कंप्लीशन सर्टिफिकेट न.प.ला तात्काळ देऊन डांबरीकरण व खडीकरणासाठी न.प. अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. जोपर्यंत हे काम होत नाही तोवर दुसरीकडे काम करून देणार नसल्याचा इशारा देत काम बंद पाडले होते. त्यानंतर आज सकाळपासून सालईवाडा निंबाळकर पीर परिसरातून या दुरूस्तीच्या कामास गॅस कंपनीकडून सुरुवात करण्यात आली आहे.










