
मालवण : शहरात दरवर्षी पावसाळ्यात गटारे तुंबून रस्ते पाण्याखाली जाण्याचे चित्र यंदा बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता आल्यानंतर पावसाळापूर्व कामांना वेग आला आहे. शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर उतरून साफसफाई मोहिमेची धुरा हाती घेतली आहे. त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत गटारे आणि व्हाळ्यांची स्वच्छता सुरू असून कामावर काटेकोर देखरेख ठेवली जात आहे.
गेल्या काही वर्षांत प्रशासकीय राजवटीमुळे नियोजनाचा अभाव जाणवत होता. याचा फटका थेट नागरिकांना बसत होता. मात्र, नव्या सत्ताधाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेत ‘मायक्रो प्लॅनिंग’च्या माध्यमातून पावसाळ्यापूर्व तयारी सुरू केली आहे. शहरातील सर्व लहान-मोठी गटारे तसेच प्रमुख व्हाळ्यांमधील साचलेली माती, गाळ आणि कचरा पूर्णपणे काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “पावसाच्या पाण्याला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि रस्ते जलमय होऊ नयेत, ही आमची प्राथमिकता आहे. कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा सभापती पूनम चव्हाण यांनी दिला आहे.
मान्सूनपूर्व मुख्य जलवाहिन्यांची साफसफाई पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यावर विशेष भर दिला जात आहे. पालिकेच्या या सक्रिय भूमिकेमुळे यंदा पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली जाण्याच्या समस्येतून काही प्रमाणात दिलासा मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त होत असून मालवणकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.










