सोशल सर्विस लीग शाळेचे शिक्षक विजय सावंत ‘साने गुरुजी पुरस्काराने’ सन्मानित

Edited by: संदीप देसाई
Published on: April 18, 2026 14:08 PM
views 28  views

मुंबई : सोशल सर्विस लीग शाळेचे शिक्षक विजय सावंत यांना लक्ष्मी शैक्षणिक संस्थेतर्फे इंग्रजी विषयातील गुणवत्ता शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सावंत म्हणाले, “हा माझा एकट्याचा सन्मान नसून ज्या संस्थेने मला शिकविण्याची संधी दिली त्या सोशल सर्विस लीग संस्थेचा आणि माझ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान आहे. रात्रशाळेत येणारे विद्यार्थी दिवसभर काम करून अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठ्या जिद्दीने प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात, हेच माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.”

मुंबईतील सायन येथील लक्ष्मी शैक्षणिक संस्थेमार्फत २०१८ पासून मराठी, हिंदी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. इंग्रजी संभाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, आदर्श शाळा स्पर्धा तसेच शिक्षकांचा गुणगौरव असे विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातात. यावेळी एन.आर.सी. माध्यमिक विद्यालय, साधना विद्यालय, एस.एल. अँड एस.एस. विद्यालय आणि नूतन ज्ञानमंदिर या शाळांचाही गौरव करण्यात आला.

सन २०२५ च्या पुरस्कारांचे वितरण यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे राज्याचे अवर सचिव (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) प्रवीण मुंढे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात आदर्श शाळा व उपक्रमशील शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील आहेर, संजय मराठे, ज्ञानेश्वर महाजन यांसह विविध मान्यवर, विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजय सावंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल गावचे सुपुत्र असून ते व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांनी एस.सी.आर.टी. पुणे, एम.ई.पी.ए. औरंगाबाद, आर.ए.ए. नाशिक आदी संस्थांमध्ये राज्यस्तरावर कार्य केले आहे. तसेच पाठ्यपुस्तकातील क्यूआर कोड निर्मितीत योगदान दिल्याबद्दल त्यांना शिक्षण मंत्र्यांकडून प्रशस्तीपत्र मिळाले आहे.

सावंत यांचे “प्रकाश किरणाच्या शोधात” आणि “जगण्याचे आर्त” हे कवितासंग्रह प्रकाशित झाले असून “धाकावयले कावळे” हा कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. यापूर्वीही त्यांना एकता कल्चरल अकादमी, मुंबईचा “महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार” तसेच अहिल्या शिक्षण संस्थेचा “गुणवंत शिक्षक पुरस्कार” प्राप्त झाला आहे.