
सावंतवाडी : माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. रंजना रवी कानसे यांच्या विजयासाठी महायुतीने कंबर कसली असून माजगाववर पुन्हा एकदा दिमाखात 'भगवा' फडकवणार असल्याचा ठाम विश्वास जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला आहे.
या निवडणुकीत महायुतीने आपली संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती जोमात आहे. स्थानिक पातळीवर संजू परब, महेश सारंग, रेश्मा सावंत, अशोक दळवी यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची धुरा सांभाळली जात आहे. माजगावच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा घेऊन महायुती मतदारांच्या दारात पोहोचत आहे. श्री देव महादेव आणि देवी सातेरीच्या आशीर्वादाने माजगावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येत्या २८ एप्रिलला महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतदान करून विरोधकांना धोबीपछाड देत माजगाव पुन्हा एकदा भगवामय होईल असा विश्वास विक्रांत सावंत यांनी व्यक्त केलाय










