वेळापत्रक बदलून पाणी टंचाई दूर होईल का ? ॲड. निता सावंत-कविटकर

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 17, 2026 18:13 PM
views 55  views

सावंतवाडी : शहरात सध्या सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. केवळ पाण्याचे वेळापत्रक बदलल्याने शहराची पाणीटंचाई दूर होणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित करत पाण्यासाठी वणवण करणाऱ्या जनतेला दिलासा देण्याची मागणी केली आहे.

शहरात अनेक ठिकाणी नियमित पाणीपुरवठा होत नसतानाही, पाणी बिलाच्या दरात कोणतीही कपात केली जात नाही. पूर्वीप्रमाणेच बिले सामान्य जनतेच्या माथी मारली जात आहेत. एकीकडे पाणी नाही, दुसरीकडे बिलाचा बोजा कमी होत नाही. त्या बिलाच्या तुलनेत बाजारात विकत मिळणारी १ लिटरची पाण्याची बाटलीही आता स्वस्त वाटू लागली आहे. शहरासाठी पाण्याची उपलब्धता कशी वाढवता येईल, यावर ठोस उपाययोजना आखण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केवळ वेळापत्रकात बदल करून प्रश्न सुटणार नाही, तर त्यासाठी दीर्घकालीन नियोजनाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांनी तात्काळ यावर तोडगा काढून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ॲड. निता सावंत-कविटकर यांनी केली आहे.