
सावंतवाडी : शहरातील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या संस्थेच्या निस्वार्थी सेवाभावी कार्याची दखल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आम. रवींद्र चव्हाण यांनी घेतली आहे. संस्थेच्या कार्याचे कौतुक करत रुग्णवाहिका सेवा व अन्य सामाजिक उपक्रमांसाठी १ लाख रुपयांची भरघोस देणगी त्यांनी दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद राऊळ यांनी ही रक्कम प्रतिष्ठानकडे सुपूर्द केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते विनोद राऊळ यांच्या माध्यमातून ही मदत संस्थेपर्यंत पोहोचवण्यात आली. रवींद्र चव्हाण यांनी प्रतिष्ठानच्या रुग्णसेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. ही मदत संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे आणि उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेले रुग्णसेवेचे कार्य कौतुकास्पद आहे. समाजातील गरजू घटकांना आधार देणाऱ्या अशा संस्थांना बळ देणे ही काळाची गरज आहे असे मत रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले असून या त्यांच्या या मोठ्या मदतीबद्दल आणि विनोद राऊळ यांच्या सहकार्याबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. या निधीचा विनियोग रुग्णवाहिकेची देखभाल आणि भविष्यातील सेवाभावी प्रकल्पांसाठी केला जाणार असल्याचे संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.











