भूमापक लाच प्रकरणी एसीबीची कारवाई | २० हजारांची मागणी उघड

सावंतवाडीत भूमी अभिलेख कार्यालयातील प्रकार | एकावर कारवाई, इतर रडारवर..?
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 17, 2026 16:16 PM
views 655  views

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाने काम करून देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) याप्रकरणी सापळा रचून कारवाई केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालमत्तेच्या पोटहिस्सा मोजणीचे काम पूर्ण करून देण्यासाठी सावंतवाडी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक ओमकार सुरेंद्र आपटे (वय - ३३) यांनी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी एसीबीने सापळा रचला. या कारवाईदरम्यान संबंधित भूमापकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक दीपक माळी करीत आहेत. दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.