सावंतवाडीत श्री औदुंबर स्वामी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 17, 2026 19:35 PM
views 11  views

सावंतवाडी : श्री औदुंबर स्वामी उत्सव समिती व पोलीस बाॅईज मित्र मंडळ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पोलीस स्टेशन समोर स्वामी समर्थांचे नूतन मंदिर उभारण्यात आले आहे. हा प्राणप्रतिष्ठाना सोहळा रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ ला अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 या सोहळ्याची सुरुवात दुपारी १२:२६ मिनिटांनी मुख्य विधीने होणार आहे. यामध्ये गणपती पूजन, पुण्याहवाचन, प्राकार शुद्धी, पितृदेवता पूजन, अग्निस्थापन, ग्रहवास्तू हवन, मुख्यदेवता हवन आणि पूर्णाहुती असे शास्त्रोक्त विधी पार पडणार आहेत. त्यानंतर दुपारी १२:३० ते १ या वेळेत भव्य महाआरती होईल. दुपारी १ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसाद आणि तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजल्यापासून सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. हा संपूर्ण सोहळा श्री औदुंबर स्वामी मंदिर आणि पोलीस बॉईज मित्र मंडळ, सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. या मंगलमयी सोहळ्याला सर्व भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस बॉईज मित्र मंडळ व उत्सव समितीच्या वतीने पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे. तसेच ज्यांना मंदिरास किंवा कार्यक्रमास स्वइच्छेने मदत करायची आहे, त्यांनी अमोल टेंबकर (९९२२३१६७७७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.