एमएनजीएलकडून पाण्याच्या लाईनची फोडाफोडी सुरूच !

▪️भीडाच्या पाईपला प्लास्टिकचा जोड ; न.प. ची डोळेझाक ?
Edited by: विनायाक गांवस
Published on: April 16, 2026 18:13 PM
views 122  views

सावंतवाडी : शहरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई करताना जुन्या नळपाण्याच्या लाईन फुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. आज येथील राजसाहेब शिवरामराजे भोसले पुतळ्यासमोरील भीडाच्या पाईप लाईन फुटल्याचा प्रकार घडला. तर फुटलेल्या जुन्या पाईपला प्लास्टिकचा जोड लावण्यात आला. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून खोदाईवेळी सतत फुटणाऱ्या लाईन बघता नगरपरिषद प्रशासनाकडून डोळे झाक होत असल्याचे नागरिकांतून बोलल जात आहे.  याबाबतची तक्रार सावंतवाडीचे प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी या पाईपलाईनवर देखरेख ठेवण्यासाठी असलेल्या अधिकाऱ्यांना पाठवत पाहाणी केली. मात्र, यावर उशिरापर्यंत तोडगा निघाला नव्हता. मुळात गॅस लाईनसाठी ३ फुट खोदकाम करत असताना २ फुटांवर असणाऱ्या पाणीपुरवठा लाईनचा आराखडा न.प. प्रशासनाकडे नाही का ? असा सवाल उपस्थित होत आहे. वारंवार पाईप लाईन फुटण्याचे प्रकार बघता डबल उद्योग होताना दिसत आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून या गंभीर बाबीकडे होणार दुर्लक्ष नेमकं कशासाठी ? असाही सवाल उपस्थित होत आहे.

तर दुसरीकडे न.प.चे कर्मचारी प्रत्यक्ष कोणीही देखरेख ठेवायला नाहीत. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमल्याचे सांगत न.प.चे अधिकारी हात वर करत आहेत. ३ फुटांवर गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करताना २ फुटांवर असणाऱ्या पाणीपुरवठा लाईनचा आराखडा न.प. कडेच उपलब्ध नसल्याचे गॅस पाईपलाईनच्या कर्मचाऱ्यांच म्हणणं आहे. त्यामुळेच पाण्याची पाईपलाईन फुटण्याचे प्रकार होत असल्याचे त्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे गॅस पाईपलाईन कंपनी आपल्या मनाला येईल तशी खोदाई करत सुटले आहे. आपले काम पूर्ण करण्याच्या मागे ते असल्याचे दिसून येत आहे. मोती तलाव मार्गे भटवाडी पर्यंत ही लाईन टाकण्यासाठीची घाई त्यांच्याकडून होत आहे. गुरूवारी रामेश्वर प्लाझा परिसरात खोदाई करताना या कंपनीने तर हद्दच गाठली. खोदाई करताना पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला धक्का लागला. त्यामुळे जुन्या भीड्याचा पाईप लाईनचा काही भाग काढून टाकण्यात आला. पण, त्या ठिकाणी प्लास्टिक पाईपचा जोड देत काम उरकण्याचा प्रकार घडला. यावेळी नागरिकांनी त्यांना रोखत ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यात आली. यावेळी त्यांनी गॅस पाईपलाईनवर देखरेख ठेवण्यासाठी अभियंता तुषाय सरडे यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना घटनास्थळावर पाठवले. त्यांनी घडलेला प्रकार बघितला व आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढतो असे सांगून काम थांबविण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, गॅस कंपनीचे अधिकारी या प्रकारावरून सारवासारव करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी आम्ही घातलेली प्लास्टिक पाईपला काही होणार नाही. ती कोल्हापूरहून मागवली असून जाड इंचाची असल्याने एकवेळ भीडाचा पाईप तुटेल पण प्लास्टिक तुटणार नाही असे सांगितले. उशिरापर्यंत यावर  तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे न.प. प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. दुसरीकडे एमएनजीएल गॅस कंपनीकडून रस्याच्या डांबरीकरणासाठी ८ कोटी रुपये न.प. कडे भरण्यात आल्याचे गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत विचारले असता येणाऱ्या स्थायी समिती बैठकीत टेंडर मान्यतेबाबत निर्णय होणार असून त्यानंतर लगेचच डांबरीकरण करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.