शक्तीपीठला शिवसेनेचा कडाडून विरोध

कोकणच्या मुळावर उठणारा महामार्ग | ; रस्त्यावर उतरण्याचा वैभव नाईक यांनी दिला इशारा | कोकणचा फायदा काय ? | पालकमंत्र्यांनी उत्तर देण्याची मागणी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 16, 2026 21:05 PM
views 102  views

कुडाळ  :  शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यामुळे कोकणच्या व्यापार आणि पर्यटनाचे कंबरडे मोडणार असून, हा प्रकल्प कोकणवासीयांच्या हिताचा नसेल तर शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असा इशारा आज कुडाळ येथे देण्यात आला. कुडाळ एमआयडीसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांच्या धोरणांचा जोरदार पंचनामा करण्यात आला. शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन नकाशावर बोट ठेवत शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा महामार्ग राधानगरीपर्यंत येतो आणि तिथून थेट पात्रादेवीकडे वळतो. याचा अर्थ मुंबईतून निघालेला प्रवासी किंवा पर्यटक कोकणात पाऊल न ठेवता थेट सीमेबाहेर पडणार आहे.

"आम्ही महामार्गाच्या विरोधात नाही, पण जर हा मार्ग कोकणला वळसा घालून जाणार असेल, तर येथील व्यापाराचे काय? कोकणच्या बाजारपेठा ओस पडणार असतील तर हा विकास कोणासाठी?" असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. कोकणची अर्थव्यवस्था पर्यटन आणि स्थानिक व्यापारावर अवलंबून आहे. मात्र, या महामार्गामुळे पर्यटक अंतर्गत कोकणात न येता बाहेरूनच निघून जातील. यामुळे हॉटेल व्यवसाय, स्थानिक उत्पादने आणि पर्यटन स्थळे दुर्लक्षित राहून कोकणाचे अपरिमित नुकसान होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

सत्ताधारी आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांवर हल्लाबोल करताना शिवसेना नेत्यांनी विचारले की: या महामार्गाचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेमका काय फायदा आहे? येथील  व्यापार धोक्यात घालून कोणता 'विकास' साधला जात आहे?

"सिंधुदुर्गवासीयांच्या पोटावर पाय देऊन जर महामार्ग पुढे रेटला जात असेल, तर शिवसेना शांत बसणार नाही. कोकणच्या अस्तित्वासाठी आणि व्यापारासाठी आम्ही रस्त्यावर उतरू," असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या पत्रकार परिषदेमुळे आता शक्तीपीठ महामार्गावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली असून, सरकारची भूमिका पुढे काय असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.