
सावंतवाडी : शहरातील बिरोडकर टेंब द्वारकानगरी परिसरातील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या रुबी खातून मुन्ना खान (वय, 20, मूळ रा. बिहार , सध्या रा. द्वारकानगरी सावंतवाडी ) हिचे शुक्रवारी रात्री निधन झाले, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. उपचारासाठी तीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्याठिकाणी रूम मधील लाईट गेल्याने ट्यूबलाईट आणण्यासाठी चौथ्या मजल्यावर ती आणि तिचे पती गेले होते. ट्यूबलाईट जोडत असताना अंधारात खाली पडल्याने तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सावंतवाडी पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक दाखल झाले होते.











