
सावंतवाडी : तालुक्यातील तेरेखोल नदीपात्रात माडखोल ते बांदा या पट्ट्यात गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू, दगड आणि मौल्यवान खनिजांचे बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या अवैध प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्यास १५ एप्रिल रोजी नदीपात्रात आत्मदहन करण्याचा इशारा संजय विठ्ठल राणे यांनी प्रशासनाला दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी पूरस्थिती टाळण्यासाठी नदीपात्रातील गाळ काढण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाचा गैरफायदा घेत काही स्थानिक अधिकारी आणि गोव्यातील व्यापाऱ्यांच्या अभद्र युतीने वाळू आणि दगडांची तस्करी सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सांगेली, माडखोल, ओटवणे, इन्सुली, सातोळी, बावळट, शेर्ले आणि बांदा या भागात नदीकिनारी वाळू आणि दगडांचे मोठे ढीग साठवून ठेवले जात आहेत. क्रशर आणि इतर यंत्रांच्या साहाय्याने वाळू आणि दगड वेगळे केले जातात. रात्री-अपरात्री आणि पहाटेच्या सुमारास या मालाची बेकायदेशीर वाहतूक केली जाते असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनात तेरेखोल नदीपात्रातील नमूद गावांमध्ये साठवून ठेवलेले वाळू-दगडांचे साठे त्वरित जप्त करावेत, सातोळी-बावळट येथील क्रशरची तातडीने तपासणी करण्यात यावी, नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करणाऱ्या आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून कारवाई न झाल्यास १५ एप्रिल २०२६ रोजी माडखोल-मांगेली नदीपात्रात आत्मदहन करणार असल्याचा इशारा श्री. राणे यांनी दिला आहे. तसेच मुंबई ते सावंतवाडी प्रवासा दरम्यान किंवा आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.











