
सावंतवाडी : तंत्रज्ञानाच्या युगात जग चंद्रावर पोहोचले असले, तरी श्रद्धेच्या जोरावर काय घडू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण सावंतवाडी तालुक्यापासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या कोलगाव-झिरंगवाडी (सुकेतळे) येथे पाहायला मिळते. निसर्गाच्या कुशीत, एका विशाल शिळेवर नैसर्गिकरित्या उमटलेली मारुतीरायाची प्रतिकृती आणि तिथे पोहोचण्यासाठी करावा लागणारा ३ किमीचा खडतर डोंगरप्रवास, हे भक्तीचे एक अनोखे दर्शन घडवते. मात्र, आता या जागृत देवस्थानाला डागडुजीची गरज निर्माण झाली आहे. यासाठी हनुमंत भक्तांनी पुढाकार घेतला असून सहकार्याचे आवाहन केले आहे.
या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे पोहोचण्यासाठी साधा कच्चा रस्ताही नाही. घनदाट जंगल आणि तीव्र चढणीच्या वाटेने डोंगर चढून जावे लागते. विशेष म्हणजे, १५-२० वर्षांपूर्वी जेव्हा हे मंदिर उभारले, तेव्हा सिमेंटच्या गोण्यांपासून ते पत्र्यांपर्यंत सर्व जड साहित्य ग्रामस्थांनी चक्क आपल्या पाठीवर आणि डोक्यावरून ३ किमी डोंगर चढून नेले होते. आजही येथे कोणतीही औपचारिक कमिटी नाही. केवळ ग्रामस्थांची एकजूट हेच या मंदिराचे खरे वैभव आहे. डोंगर भागामुळे या ठिकाणी अद्याप विजेची सोय नाही. हनुमान जयंतीला जेव्हा हजारो भाविक येतात, तेव्हा महाप्रसादाचे नियोजन करणे हे एक मोठे आव्हान असते. विहीर खालच्या बाजूला असल्याने आणि पंप नसल्याने, स्थानिक ग्रामस्थ आजही २०० ते ३०० पाण्याच्या कळश्या डोक्यावर वाहून उंचावर नेतात. तसेच, गॅसची सोय नसल्याने डोंगरदऱ्यातून वाळलेली लाकडे गोळा करून चुलीवरच हजारो भाविकांचा महाप्रसाद शिजवला जातो. अनेक वर्षे ऊन-पावसाचा मारा सोसल्यामुळे आता मंदिराच्या पत्र्यांची शेड पूर्णपणे गंजली असून ठिकठिकाणी पडझड होत आहे. पावसाळ्यात भाविकांना दर्शनासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. पाण्यापासून साहित्यापर्यंत सर्वकाही डोक्यावर वाहून नेण्याची जिद्द आजही ग्रामस्थांकडे आहे. आता गरज आहे ती फक्त दातृत्वाच्या हातांची अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. या जागृत मारुती मंदिराच्या दुरुस्तीसाठी पत्रे, सिमेंट, बांधकाम साहित्य किंवा आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे आवाहन स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. इच्छुकांनी या सत्कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी प्रविण सावंत: 94058 33955, विशाल पित्रे: 9405475712, शामप्रसाद पित्रे: 9421148556, हेमंत कासार: 7219156234, तुषार कासार: 94229 79391, तुकाराम कासार: 94227 67793, महेश सावंत: 88064 65621, गौरव कासार: 96232 65082, गौरव कुडाळकर: 86980 71910 यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे










