
देवगड : देवगड तालुक्यातील वाडातर येथे तरुण विकास मंडळ, वाडातर (रजि.) मुंबई यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा २०२६ च मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येणार आहे. विविध धार्मिक,सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हनुमान जन्मोत्सव दरम्यान ह.भ.प. सौ. लतिकाताई सावंत (स्वराज्यरक्षक संभाजी फेम धाराऊमाता) यांचे प्रवचन कार्यक्रम होणार आहे.
बुधवार, १ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होम-हवन व लघुरुद्राभिषेकाने सोहळ्याची सुरुवात होणार आहे. दुपारी १२ वाजता श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ, वाडातर यांचे भजन होईल. सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या हस्ते गंगा आरतीचा शुभारंभ होणार असून रात्री १० वाजता तालुकास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.गुरुवार, २ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता ह.भ.प. श्री शिरीष कोरगांवकर महाराज (मुंबई) यांचे प्रवचन होईल. सकाळी ६.३३ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.त्यानंतर महापूजा,आरती, सामूहिक नामजप व दुपारी महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला आहे.सायंकाळी ५ वाजता पालखीची भव्य मिरवणूक निघणार असून रात्री विविध भजन कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार, ३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अनंत श्री विभूषित जगद्गुरूरामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचे प्रवचन इंद्रप्रस्थ हॉल येथे होणार आहे. या कार्यक्रमाला नितेश राणे तसेच धनंजय (भाई) देसाई उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व खेळ पैठणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रात्री विविध भजन,मान्यवरांचा सत्कार आणि स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.शनिवार,४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा व आरती होणार असून रात्री वाडातर ग्रामस्थ भजन मंडळाचे भजन तसेच महिलांची डबलबारी भजन स्पर्धा रंगणार आहे.हा चार दिवसांचा सोहळा भक्ती,संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संगम ठरणार असून सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.











