
सावंतवाडी : भक्ती, शक्ती आणि सेवा या त्रिसूत्रीवर आधारलेला 'जय हनुमान मित्रमंडळ, पेडवेवाडी'चा प्रवास यंदा एका सुवर्ण टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. श्री हनुमान मंदिराच्या स्थापनेचे हे रौप्यमहोत्सवी (२५ वे) वर्ष असून, त्यानिमित्त गुरुवार, दि. २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सवाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या अडीच दशकांपासून ग्रामस्थांचा अजोड सहभाग, देणगीदारांचे दातृत्व आणि कार्यकर्त्यांच्या निस्सीम भक्तीमुळे हे मंदिर पंचक्रोशीचे श्रद्धास्थान बनले आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यंदाचा उत्सव अधिक दिमाखदार पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प मंडळाने सोडला आहे. सकाळी ८.०० वाजेपासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे:
सकाळी ८.३० वा.: श्री हनुमान मूर्ती पूजा व मंगल अभिषेक, सकाळी १०.०० वा.: श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.०० वा.: सत्यनारायण व हनुमान महाआरती, दुपारी १.०० वा : महाप्रसादास सुरुवात, रात्री ७.०० ते ९.०० वा.: स्थानिक ग्रामस्थांची सुश्राव्य भजने, रात्री ९.३० वा.: 'जय संतोषी माता दशावतार नाट्यमंडळ (मातोंड-पेंडूर)' यांचा भव्य दशावतारी नाट्य प्रयोग. तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय हनुमान मित्रमंडळ, पेडवेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.










