
सावंतवाडी : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ (गोवा) येथील 'आयुष' रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सिंधुदुर्गातील रुग्णांची वाढती संख्या आणि प्रवासाची गैरसोय लक्षात घेता, सावंतवाडी नगरपालिकेच्या इमारतीत या रुग्णालयाचे बाह्यरुग्ण तपासणी केंद्र (OPD) व औषध साठवणूक केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना निवेदन दिले आहे.धारगळ येथील आयुष रुग्णालयात सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात जात आहेत. या उपचारांचे चांगले परिणाम मिळत असल्याने रुग्णांचा ओघ वाढला आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांना गोव्यापर्यंतचा प्रवास करणे खर्चिक आणि त्रासाचे ठरत आहे. जर सावंतवाडी शहरात ही ओपीडी सेवा सुरू झाली, तर जिल्ह्यातील रुग्णांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.
शासकीय परवानग्या प्राप्त
केंद्र शासनाकडून सावंतवाडी येथे बाह्यरुग्ण तपासणी केंद्र सुरू करण्यासंदर्भात सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. नियमानुसार हे केंद्र शासकीय जागेतच चालवणे बंधनकारक आहे. त्यामुळे नगरपालिकेने आपल्या इमारतीमध्ये यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास भविष्यात सिंधुदुर्गातील हजारो रुग्णांना या अत्याधुनिक आयुर्वेद सेवेचा लाभ घेता येईल, असे सुर्याजी यांनी निवेदनात म्हटले आहे.
नगरपालिकेने या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक सहकार्य करावे, जेणेकरून आरोग्य सुविधेत मोलाची भर पडेल, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. यावेळी संघटनेचे सहसचिव ॲड. वसंत सावंत, ॲड. प्रथमेश प्रभू, मंदार सावंत आदी उपस्थित होते.










