
कणकवली : कणकवली शहराचा प्रसिद्ध झालेला विकासाच्या प्रारुप आराखडयात बहुतांशी ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकली गेली आहेत. ही आरक्षणे पडलेल्या जमिन मालकांनी येथील नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर सोमवारी उपोषण केले. उपोषणकर्त्यांची नगरविकास विभागाच्या सहाय्यक संचालक नाजमीन मोमीन यांनी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान जमिन मालकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची दमछाक झाली. प्रसिद्ध झालेला आराखडा अंतिम आराखडा नसून नागरिकांनी जास्तीत जास्तीत सूचना व हरकती नोंदवाव्यात. यावर जनसुनावणीत सविस्तर चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण तातपुरते स्थगित केले.
नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर सोमवारी जमिन मालक उमेश वाळके, शेखर राणे, सहदेव बागवे, अविनाश राणे, औंदुबर राणे, नगरसेवक राकेश राणे, मानसी मुसळे, मधुकर कदम, दत्ताराम राणे, संजय कांबळी, संतोष राणे, उन्मेश राणे, दिलीप राणे यांच्यासह जमिन मालक उपोषणाला बसले होते. त्यांच्या उपोषणाची दखल नगरविकास विभागाच्या अधिकारी नाजमीन मोसीन यांनी घेत दुपारी उपोषणस्थळी भेट देत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या दालनात बोलवले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक संकेत नाईक, लुकेश कांबळे, तेजस राणे, नगरविकास विभागाचे अक्षता शेळे, जीवन सरडे, दीपक सुर्वे उपस्थित होते.
उमेश वाळके यांनी नवीन पारूप आराखडयात क्रीडा संकुलासाठी टाकलेल्या आरक्षणाला आक्षेप घेतला. तसेच नगररचना विभागाने चुकीच्या पद्धतीने आराखडयात आरक्षणे टाकल्याचा आरोप केला. यावर सदर आराखडा अंतिम नसून नागरिकांनी सूचना व हरकती नोंदवावाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या आरक्षणावरून जमिनी मालकांनी प्रश्नांचा भडिमार करीत सदर आरक्षणे टाकण्याबाबत नगरपंचयातीने आपल्या विभागाशी पत्रव्यवहार केला होता का ? की संबंधित यंत्रणेने गाऊंड लेव्हलवर न जाताच आरक्षणे टाकली? असे सवाल देखील केले. शहराचा प्रारुप विकास आराखडा ७ एप्रिल २०२५ मध्ये बनविण्यात आला. १० एप्रिल २०२५ मध्ये प्रसिद्ध ठरेल. परंतु तब्बल ११ महिन्यांच्या कालावधीनंतर सदर आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. आराखडाप्रसिद्ध करण्यासाठी एवढा उशिर का लागला? आरखडा प्रसिद्ध करण्यात नगरपंचायत प्रशासन असमर्थ ठरल्याची बाब त्यांनी अधिकाºयांचा निदर्शनास आणून दिली. प्रसिद्ध झालेल्या आराखडयात चुकीच्या ठिकाणी ग्रीन व यलो झोन टाकण्यात आल्याचे त्यांनी अधिकाºयांच्या लक्षात आणून दिले. यावर सदर आराखडा अंतिम नाही, त्यामुळे नागरिकांनी २७ मार्चपर्यंत आपल्या सूचना व हरकती नोंदवावाव्यात. त्यानंतर जनसुनावनी लावण्यात येणार असून प्राप्त हरकतींवर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आराखडा रद्द ठराव घ्यावा
कणकवली शहराचा प्रसिद्ध झालेला डीपी प्लॅनमध्ये चुकीच्या ठिकाणी यलो, ग्रीन झोन व आरक्षणे टाकली गेली आहेत. त्याला नागरिकांची विरोध आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी डीडी प्लॅन रद्द करण्याचा ठरावा घ्यावा, अशी भूमिका जमीन मालकांनी मांडली.











