संशयास्पद मृत्यू प्रकरण तापले; पत्नी - मुलाचे उपोषण सुरू

चुकीच्या निदानामुळे ‘एचआयव्ही’चा ठपका ; चौकशीची मागणी तीव्र
Edited by:
Published on: March 23, 2026 19:34 PM
views 16  views

सिंधुदुर्गनगरी : चुकीच्या वैद्यकीय निदानामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप असलेल्या प्रकरणाने आता आंदोलनाचे स्वरूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर मयत कै. गणपत सहदेव राणे यांच्या पत्नी वंदना गणपत राणे व त्यांच्या मुलाने आज सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. तसेच या प्रकरणात ओसरगाव येथील जागृती फाऊंडेशन, संबंधित वैद्यकीय अधिकारी, तसेच ओरोस जिल्हा रुग्णालय व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मयताच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, ओसरगाव येथील एका स्वयंसेवी संस्थेच्या आरोग्य शिबिरात चुकीचे निदान करून राणे यांना एचआयव्ही बाधित घोषित करण्यात आले. त्यानुसार उपचारही सुरू करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या मृत्यूचे कारण मूत्राशयाचा आजार, मेंदूतील रक्तस्त्राव व मेंदूत रक्ताच्या गाठी असे नमूद झाले असून, या दोन्ही निदानांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, एचआयव्हीसारख्या गंभीर आजाराबाबत कुटुंबीयांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून समाजात बदनामीही सहन करावी लागल्याचे त्यांनी सांगितले. सन २०२२ मध्ये म्हापण येथे झालेल्या आरोग्य शिबिरात हा आजार आढळल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्याबाबत कोणतीही कागदपत्रे देण्यात आली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. उपचारादरम्यान संबंधित डॉक्टरांच्या अंतिम अहवालात एचआयव्हीचा उल्लेख नसतानाही आधी केलेले निदान संशयास्पद असल्याचे ते म्हणाले.

या प्रकरणात ओसरगाव येथील सबंधित संस्था, संबंधित वैद्यकीय अधिकारी, तसेच ओरोस जिल्हा रुग्णालय व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, “न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार” असा इशारा देत राणे यांच्या पत्नी व मुलाने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.