
सावंतवाडी : मार्च महिना सुरू होताच उन्हाचा कडाका वाढला असून नागरिक उकाड्याने हैराण झालेत. अशातच तालुक्यातील करिवाडे-पेडवेवाडी परिसरात काल मध्यरात्रीपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने ग्रामस्थांनी महावितरणच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एकीकडे थकीत बिलासाठी तगादा लावणारे कर्मचारी दारावर येत असताना रात्रीच्या विद्युत प्रवाह खंडित झाल्याने होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
मध्यरात्री १ च्या सुमारास दर पाच मिनिटांनी वीज खंडित होत होती. सध्या काजू-आंबा हंगाम जोरात असल्याने शेतकरी आणि कष्टकरी वर्ग दिवसभर रणरणत्या उन्हात बागेत मेहनत करतो. दिवसभराच्या कामानंतर रात्री शांत झोप मिळणे अपेक्षित असताना महावितरणच्या कारभारामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. वाढत्या उकाड्यात वीज नसल्याने लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींचे हाल होत आहेत. एकीकडे भोंगळ कारभार अन् लहरी सेवा मिळत असताना दुसरीकडे, महावितरणचे कर्मचारी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या नावाखाली वसुलीसाठी घरोघरी फिरत आहेत. केवळ एका महिन्याचे बिल थकीत असले तरी बिल भरा, नाहीतर स्मार्ट मीटर बसवू अशा प्रकारची धमकीवजा भाषा कर्मचारी वापरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बिलाच्या पैशांसाठी घरापर्यंत येणारे कर्मचारी, रात्रीच्यावेळी तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी तत्परता का दाखवत नाहीत ? तसेच थकबाकीसाठी दाखवलेली तत्परता अधिकारी सेवेत का दाखवत नाही ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.










