प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा इथं उद्या आरोग्य शिबीर

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 22, 2026 17:42 PM
views 29  views

सावंतवाडी :  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमांतर्गत यावर्षी ‘सिंधु आरोग्य मेळावा 2026’ हा 23 मार्च 2026 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा, ता. सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

या आरोग्य मेळाव्यात विविध तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत तपासणी, सल्ला व उपचार सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, नेत्ररोग तज्ञ, बालरोग तज्ञ, अस्थीरोग तज्ञ, शल्यचिकित्सक तसेच हृदयरोग तज्ञांचा समावेश आहे. तसेच, सर्वसाधारण आरोग्य तपासणी (ब्लड प्रेशर, ब्लड शुगर), विविध रक्त तपासण्या (हिमोग्लोबिन, लिव्हर व किडनी फंक्शन) तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग (मुख, स्तन, गर्भाशय मुख) यांसारख्या असंसर्गजन्य आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या शिबिरादरम्यान आयुष्यमान कार्ड व वंदना कार्ड देखील काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणारआहे. याकरिता नागरिकांनी कार्ड काढण्यासाठी येताना सोबत अद्ययावत रेशन कार्ड ,आधार कार्ड व आधार लिंक मोबाईल नंबर घेऊन येण्याचा आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून प्रमोद कामत, अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग उपस्थित राहणार आहेत. तसेच या आरोग्य मेळाव्याला  प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, पंचायत समिती सावंतवाडी,  सभापती सुष्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, गट विकास अधिकारी सावंतवाडी वासुदेव नाईक, तालुका आरोग्य अधिकारी, सावंतवाडी डॉ. रमेश कर्तस्कर, हे उपस्थित राहणार आहेत. या आरोग्य मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा व आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.