'सिंधू सरस'मध्ये उकाड्याने हैराण महिलांना दिलासा

प्रशासनाकडून तातडीने 'टॉवर फॅन'ची सोय | कोकणसाद LIVE च्या बातमीचा IMPACT
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 22, 2026 19:07 PM
views 107  views

कुडाळ : येथील 'सिंधू सरस' प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिला बचत गटांच्या होणाऱ्या समस्येची घेतली गेली दखल. वाढत्या उष्म्यामुळे महिलांचे होणारे हाल लक्षात घेता, प्रशासनाने आज तातडीने स्टॉल्सवर टॉवर फॅन्स बसवले आहेत. यामुळे कडक उन्हात स्टॉल मांडून बसलेल्या महिला उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कालपासून सुरू झालेल्या या महोत्सवात जिल्ह्यातून आलेल्या अनेक महिला बचत गटांनी आपले स्टॉल्स लावले आहेत. मात्र, सध्या सिंधुदुर्गात उन्हाचा पारा वाढल्याने आणि आर्द्रतेमुळे निर्माण झालेल्या उकाड्यामुळे या महिलांचे प्रचंड हाल होत होते. याबाबतचे वृत्त काल प्रसारित होताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आज सर्व स्टॉल्सच्या ठिकाणी टॉवर फॅन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

वाढत्या पाऱ्याचा फटका

जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट जाणवत असून तापमानाचा आलेख उंचावलेला आहे. 'सिंधू सरस' हे जिल्ह्यातील महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे. मात्र, गर्मीच्या त्रासामुळे महिलांना दिवसभर स्टॉलवर थांबणे कठीण झाले होते. आता टॉवर फॅन्समुळे हवेत काहीसा थंडावा निर्माण झाला असून, महिलांना व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे सोपे झाले आहे. उकाड्याबाबतच्या वृत्ताची दखल घेत सीईओ यांनी २४ तासांत फॅन्सची सोय केली.  प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांनाही आता काही प्रमाणात थंडावा मिळणार आहे. "कालपर्यंत असलेल्या असह्य उकाड्यामुळे स्टॉलवर थांबणे अवघड झाले होते. प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे आता आम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे.