
सावंतवाडी : खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पुणे ते कोकण दरम्यान नवीन 'अमृत भारत एक्सप्रेस' सुरू करण्याची आणि 'सावंतवाडी टर्मिनस' प्रकल्पाचा 'प्रधानमंत्री गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन'मध्ये समावेश करण्याची महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. डॉ. कुलकर्णी यांनी १३ मार्च २०२६ रोजी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून या भेटीची आणि मागण्यांची माहिती दिली.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे पुणे विभाग अध्यक्ष सिद्धेश तळवडेकर यांनी १८ फेब्रुवारी २०२६ रोजी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांना या प्रलंबित मागण्यांसंदर्भात एक सविस्तर निवेदन दिले होते. सध्या पुणे ते कोकण प्रवासासाठी केवळ आठवड्यातून दोनदा धावणारी पुणे-एर्नाकुलम (२२१४९/५०) हीच गाडी उपलब्ध असून, तिचे कोकणात केवळ चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी असे चारच थांबे आहेत.
पुणे, कोथरूड, पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव परिसरातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी रोज धावणारी नवीन 'अमृत भारत एक्सप्रेस' सुरू करावी किंवा नांदेड-पुणे-पनवेल एक्सप्रेसचा (१७६१३/१४) सावंतवाडीपर्यंत विस्तार करावा, अशी मागणी संघटनेने पत्रात केली होती. मडगाव आणि मुंबई येथील टर्मिनल स्थानकांवरील ताण कमी करण्यासाठी सावंतवाडी टर्मिनसची संकल्पना मांडण्यात आली होती, जेणेकरून कोकणी जनतेला त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळेल. मात्र प्रशासकीय विलंब आणि निधीच्या अभावामुळे हा प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी त्याचा 'प्रधानमंत्री गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन'मध्ये समावेश करणे गरजेचे असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. यामुळे खालील फायदे होतील: गतीशक्ती अंतर्गत सावंतवाडी स्थानक हे राष्ट्रीय महामार्ग ६६, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ (गोवा), एमएसआरडीसीचा प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्स्प्रेसवे आणि रेडी पोर्ट यांना जोडणारे एक प्रमुख लॉजिस्टिक हब बनेल. सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्याच्या आणि संपूर्ण कोकणच्या विकासाला यामुळे मोठी चालना मिळेल. टर्मिनसच्या देखभालीसाठी तिलारी धरणातून आवश्यक असणारा पाणीपुरवठा मिळवण्यासाठी गतीशक्ती योजनेमुळे विविध मंत्रालयांमध्ये समन्वय साधणे शक्य होईल.
या रास्त मागण्यांची दखल घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली आहे. यामुळे आता पुणे-कोकण रेल्वे प्रवासाचा मार्ग सुखकर होण्याची आणि सावंतवाडी टर्मिनसच्या कामाला गती मिळण्याची आशा कोकणवासीयांमध्ये निर्माण झाली आहे.










