विकासनिधी’चं सत्ताधाऱ्यांकडून श्रेय लाटण्याचं काम

समीर नलावडे, बंडू हर्णे यांचा आरोप
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 13, 2026 19:28 PM
views 36  views

कणकवली : कणकवली शहराच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आम्ही सत्ताधारी असताना निधीची मागणी केली होती. त्यानुसार २०२५-२६ साठी १२ कोटी ६० लाख ४३ हजार रुपयांचा निधी दिला. या निधी अंतर्गत मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन सत्ताधारी मंडळी करीत असून विकासनिधीचे श्रेय लाटण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत, असा आरोप माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला.

समीर नलावडे संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत श्री. नलावडे, श्री. हर्णे बोलत होते. हर्णे म्हणाले, कणकवली नगरपंचायतीवर भाजपची सत्ता होती. सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंत्री नितेश राणे केली होती. त्यानुसार त्यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सन २०२५-२६ यासाठी मंत्री नितेश राणे यांनी शासन व जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून १२ कोटी ६० लाख ४३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधी अंतर्गत शहरात विविधकामे मंजूर झाली आहेत. या कामांचे भूमिपूजन सत्ताधारी मंडळी करून विकासनिधी व कामांचे श्रेय लाटण्याचे काम करीत आहे. शहरातील विविध विकासकामांसाठी ८ कोटी ४७ लाखांचे निधी मंजूर झाला असून क्रीडा संकुलाच्या पेज २ साठी ४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे आम्ही सत्तेत असताना पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर करून आणली आहेत. त्यामुळे कामांचे फुकटचे श्रेय सत्ताधाºयांनी घेऊ नये, असा टोला हर्णे यांनी लगावला.

समीर नलावडे म्हणाले, आमच्याकडे सत्ता होती तेव्हा शहराच्या विकासाचे दायित्व आमच्याकडे होते, हे दायित्व आम्ही समर्थपणे निभावले. २०२५ मध्ये झालेल्या न. पं. च्या निवडणुकीत सत्ताबदल झाला. आता शहराच्या विकासाचे दायित्व सत्ताधाºयांवर आहे. सत्ताधाºयांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी निधी येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करणार आहोत. शहराच्या विकासाला आमचा विरोध असणार नाही. मात्र, सत्ताधारी चुकीच्या पद्धतीने कारभार करीत असतील, त्याला कडाडून विरोध केला जाईल. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहराच्या विकासासाठी २०० कोटीची निधी आणणार असल्याची घोषणा केली आहे, त्यांनी ही घोषणा सत्यात उतरून दाखविल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू, असे त्यांनी सांगितले.

विकास आराखडयात नागरिकांवर अन्याय नको !

कणकवली शहराच्या विकासाचा प्रारूप आराखडा नगरविकास विभाग, नगरपंचायत विभागाने प्रसिद्ध केला आहे. या आराखडयात ५१० हेक्टर जमिनीवर आरक्षणे टाकली आहेत. या आरक्षणाला नागरिकांचा विरोध आहे. चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या आरक्षणाच्याविरोधात जमिन मालक व नागरिक उपोषण करणार आहे. त्यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा असणार आहे. प्रारूप आराखडयाबाबत सूचना व हरकतींसाठी २६ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. या आराखडयात नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता नगरविकास विभाग, नगरपंचाय, सत्ताधाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन समीर नलावडे यांनी केले.