
दोडामार्ग : पंचक्रोशीतील स्थानिक शेतकऱ्यांची "तळकोकण फार्मा प्रोड्युसर कंपनी" यांच्या माध्यमातून साटेली-भेडशी येथील विजयदुर्गा ॲग्रो सर्विस येथे शुक्रवारी काजू खरेदीचा शुभारंभ बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक विजय कुमार रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कंपनीचे अध्यक्ष भिकाजी गणपत्ये, उपाध्यक्ष संतोष झोरे, सचिव प्रेमनाथ कदम तसेच संचालक नारायण गवस, नारायण नाईक, रामचंद्र भिसे, अंकुश नाईक यांच्यासह शेतकरी मंदार गणपत्ये, नागेश धर्णे, ओंकार ठाकूर देसाई, सगुण गवस, लवू गवस आणि सौ. विनिता देसाई यांची उपस्थिती होती.
काजू खरेदी शुभारंभ प्रसंगी बोलताना अध्यक्ष भिकाजी गणपत्ये यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळवून देणे हा कंपनीचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असून उत्पादकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक विजय कुमार रेड्डी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तळकोकण फार्मा प्रोड्युसर कंपनीचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेला बँकेकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष झोरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन विनिता देसाई यांनी केले. काजू खरेदीच्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी हंगामात अधिकाधिक शेतकरी सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.










