
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल होत असून सकाळी पडणारे दाट धुके आणि 'खार' (दव) यामुळे बागायतदार मोठ्या संकटात सापडले आहेत. या बदलत्या हवामानाचा फटका केवळ शेतीलाच नव्हे, तर मानवी आरोग्यालाही बसत असून परिसरात आजारांचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात धुक्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच दाट धुके असल्याने बागांमध्ये 'खार' साचत आहे. सध्या आंबा आणि काजूचा हंगाम महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच निसर्गाच्या या लहरीपणामुळे फळांवर काळा डाग पडण्याची भीती निर्माण झाली आहे. सूर्योदय होऊनही धुक्याच्या चादरीमुळे उशिरापर्यंत सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नसल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे पिकांच्या वाढीवर आणि दर्जावर विपरित परिणाम होत आहे. यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.
वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे घराघरात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले आहेत. सकाळी थंड आणि दाट धुके, तर दुपारी कडक ऊन अशा विषम हवामानामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होत आहे. दम्याचा त्रास असलेल्या रुग्णांनाही या धुक्यामुळे श्वसनाचा त्रास जाणवू लागला आहे.
दाट धुक्यामुळे रस्ते आणि महामार्गावरील दृश्यमानता अत्यंत कमी झाली आहे. सकाळी कामावर जाणारे नोकरदार आणि वाहनधारकांना समोरचा रस्ता दिसत नसल्याने वाहनांचे दिवे लावून संथ गतीने प्रवास करावा लागत आहे. धुक्यामुळे सूर्यदर्शन उशिराने होत असल्याने सकाळच्या सत्रातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.येत्या काळात जर हेच वातावरण कायम राहिले, तर आंबा-काजूच्या उत्पादनात मोठी घट येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.










