
सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सिंधुदुर्ग जिल्हा मंडळ आणि कोमसाप शाखा कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील १७ आदर्श कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, ८ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय सेमिनार हॉल येथे संपन्न होणार आहे. या संदर्भात शुक्रवारी सावंतवाडी येथील 'पर्णकुटी' विश्रामगृह येथे जिल्हा कार्यकारी मंडळाची तातडीची बैठक जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील नारीशक्तीचा गौरव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
विविध क्षेत्रांतील कार्याची दखल
साहित्य, संस्कृती, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, वैद्यकीय, पत्रकारिता आणि महिला बचत गट अशा विविध स्तरांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व महिलांना सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरविण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात आणि सामाजिक-सांस्कृतिक चळवळीत महिलांचे योगदान मोलाचे असून, त्यांच्या प्रेरणेमुळेच जिल्हा एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी देसाई यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक संचालिका नीता राणे आणि कोमसाप महिला विभाग प्रमुख वृंदा कांबळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के असतील. या बैठकीला जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, सहसचिव सुरेश पवार, सदस्य भरत गावडे, विठ्ठल कदम, तालुकाध्यक्ष दीपक पटेकर, अभिमन्यू लोंढे आदी उपस्थित होते. हा गौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी आणि महिलांच्या कर्तृत्वाला दाद देण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष वालावलकर व तालुका सचिव सुरेश पवार यांनी केले आहे.










