
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छतेच्या व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रुग्णांच्या वापरातील बेडशीट व कपडे धुण्याचे काम गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून ठप्प असल्याने अनेक वॉर्डमध्ये वापरलेले बेडशीट व कपडे साचून पडल्याचे चित्र दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारीपासून आतापर्यंतचे बेडशीट व रुग्णांचे कपडे वॉर्डमध्येच पडून आहेत. त्यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वापरलेले कपडे व बेडशीट वेळेवर स्वच्छ न केल्याने रुग्णालय परिसरात दुर्गंधी पसरत असून संसर्गजन्य आजार फैलावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय काही वॉर्डमध्ये रुग्णांना खराब व अस्वच्छ बेडशीट वापरण्याची वेळ येत असल्याने रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असल्याची चर्चा रुग्णालय परिसरात रंगली आहे.
इतर कर्मचाऱ्यांवर कपडे धुण्याचा दबाव
दरम्यान, कपडे धुण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हे काम करण्यास नकार दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून इतर नियमित तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांवर हे काम करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या कामाच्या कक्षेबाहेरील काम जबरदस्तीने सोपवण्याचा प्रयत्न होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी पसरली आहे.
अधिष्ठाता बदलण्याची मागणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दवंगे यांच्या कार्यपद्धतीबाबत आधीपासूनच नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. आमदार नीलेश राणे तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनीही त्यांच्या कामकाजाबाबत नाराजी दर्शवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णालयातील वाढत्या गैरव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर डॉ. दवंगे यांची तात्काळ बदली करून प्रशासनात सुधारणा करावी, अशी मागणी रुग्ण व जिल्हावासीयांकडून होत आहे. दरम्यान, रुग्णालयातील स्वच्छतेच्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.










