
कुडाळ : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीच्या रणांगणात एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. माजी अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यांनी आपल्या निवडणूक प्रचारात चक्क न्यायाधीशांसोबतचे फोटो वापरल्याने आणि कोल्हापूर हायकोर्ट सर्किट बेंच स्वतःच आणल्याची जाहिरातबाजी केल्याने त्यांची उमेदवारी आता रडारवर आली आहे. याप्रकरणी त्यांची उमेदवारी रद्द करून त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीसमोर दाखल केली आहे.
याचिकेनुसार, ॲड. संग्राम देसाई यांनी निवडणुकीसाठी काढलेल्या प्रचार साहित्यावर अनेक वरिष्ठ न्यायाधीशांसोबतचे स्वतःचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. हा प्रकार मतदारांना (वकिलांना) प्रभावित करण्याचा आणि न्यायव्यवस्थेच्या प्रतिमेचा गैरवापर करण्याचा थेट प्रयत्न असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
ॲड. किशोर वरक यांनी यावर कडक शब्दांत टीका केली असून ते म्हणाले, "बार कौन्सिल निवडणूक आचारसंहिता नियम २०२६ च्या नियम ६ आणि ५ चे हे स्पष्ट उल्लंघन आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे की फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील ही बेकायदेशीर जाहिरातबाजी सुरू आहे."
सर्किट बेंचच्या श्रेयावरून वाद
कोल्हापूर हायकोर्ट सर्किट बेंच स्थापन करण्याचे श्रेय हे प्रामुख्याने सरन्यायाधीश भूषण गवई आणि अनेक वर्षांच्या लढ्याला जाते. मात्र, संग्राम देसाई हे सर्किट बेंच आपणच आणले असा आभास निर्माण करून वकिलांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. अॅडव्होकेट अॅक्ट कलम ३५: या कलमांतर्गत व्यावसायिक गैरवर्तणुकीसाठी देसाई यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
माजी अध्यक्ष असूनही पदाचा आणि फोटोंचा असा वापर करणे हे लोकशाही आणि व्यावसायिक नैतिकतेला धरून नसल्याचे तक्रारदार सिद्धार्थ इंगळे यांनी म्हटले आहे. या तक्रार पिटीशनवर काय सुनावणी होणार, यामुळे संग्राम देसाई यांच्यासह त्यांच्यासोबत निवडणूक लढवणाऱ्या संपूर्ण पॅनलचे अस्तित्व धोक्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.










