आरोस इथं गुढीपाडवा व रामनवमी निमित्त जिल्हा मर्यादित अभंग गायन स्पर्धा

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 06, 2026 14:43 PM
views 14  views

सावंतवाडी : तालुक्यातील आरोस येथे गुढीपाडवा व रामनवमीच्या निमित्ताने दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील श्री देव गिरोबा नाट्य मंडळ, आरोसकडून गुढीपाडवा व रामनवमी महोत्सव विशेष सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये विभागून घेण्यात येणार असून यामध्ये १५ वर्षांपर्यंत बालगट व १५ वर्षांच्या वरील खुला गट असे विभाग असतील. या अभंग गायन स्पर्धेसाठी १२ मार्च पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 

या स्पर्धेसाठी खालील प्रमाणे नियम व अटी ठरविण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्पर्धेतील स्पर्धकांनी मराठी भाषेतील संत रचित अभंग सादर करणे अनिवार्य आहेत. अभंग चित्रपट गीतांच्या चालीवर नसावा, सादरीकरणासाठी ५ ते ८ मिनिट वेळ दिला जाईल. स्पर्धेसाठी संगीत साथसंगत आयोजकांमार्फत पुरविली जाईल. सदर स्पर्धेचे परीक्षण अनुभवी व पारंगत परीक्षकांमार्फत केले जाणार असून परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल. स्पर्धेसाठी नाममात्र ₹१०१/- प्रवेश फी आकारण्यात आली असून सदर प्रवेश फी स्पर्धेपूर्वी आयोजकांकडे जमा करावयाची आहे. सदर स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकानी तबला व हार्मोनियमच्या साथीने आपल्या आवाजातील तीन ते चार मिनिटांचा व्हिडिओ आयोजकांकडे पाठविणे आवश्यक असून बालगटासाठी(वय १५ वर्षांपर्यंत) 9667042782 आणि मोठा गट (वय १५ वर्षांवरील) 9405390288/ 9403723650 या व्हॉट्सॲप क्रमांकावर दिनांक १२ मार्च पर्यंत पाठवायचा आहे.

तज्ञ परीक्षकांच्या मार्फत आपण पाठविलेल्या व्हिडिओचे परीक्षण करून बालगटासाठी २० व मोठ्या गटासाठी २० स्पर्धकांची अंतिम निवड केली जाईल. निवड झालेल्या स्पर्धकांना फोन करून निवडीबाबत कळविले जाईल. बाल गटातील स्पर्धा गुरुवार १९ मार्च २०२६ रोजी रात्र ठीक ८.०० वाजता सुरू करण्यात येईल तर मोठ्या गटातील स्पर्धा २० मार्च रोजी रात्री ठीक ८.०० वाजता सुरू होईल. स्पर्धा संपन्न होताच मान्यवरांच्या हस्ते त्या त्या दिवशी बक्षीस वितरण केले जाईल. स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी मर्यादित आहे त्यामुळे स्पर्धकाने येताना आपले आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून आणणे आवश्यक आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची बक्षीसे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील. लहान गटासाठी प्रथम क्रमांक ₹ ५०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक ₹ ३०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक ₹ २०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र त्याचबरोबर उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना प्रत्येकी ₹१०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. त्याचप्रमाणे मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक ₹.७५००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक ₹.५०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक ₹.३०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी ₹.१५००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.