चिपळूण येथील डेरवण युथ गेम्स 2026 कॅरम स्पर्धेत साक्षी रामदुरकर विजेती !

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 06, 2026 13:38 PM
views 15  views

सावंतवाडी : डेरवण, चिपळूण येथील श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित कॅरम स्पर्धेत सोळा वर्षाखालील मुलींच्या गटात सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदुरकर हीने विजेतेपद मिळवले. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील विदयार्थी या स्पर्धेत सहभाग घेतात. ट्रस्टतर्फे मागील बारा वर्षे कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मुक्ताई ॲकेडमीचे विद्यार्थी गेली नऊ वर्षे सातत्याने या स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिके मिळवत आहेत.

साक्षी रामदुरकर हीने रत्नागिरीच्या स्वरा मोहिरे हिच्यावर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. साक्षीला मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. मागील चार वर्षे साक्षी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक श्री.कौस्तुभ पेडणेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कॅरमचा सराव करत आहे. साक्षीची शालेय कॅरम स्पर्धेत चार वर्षे सातत्याने राष्ट्रीय स्तरावर निवड होत आहे. त्याचबरोबर शालेय बुदधिबळ स्पर्धेत चार वर्षे साक्षीची विभाग स्तरावर निवड होत आहे. अशी निवड होणारी ती कोकणातील एकमेव विदयार्थिनी आहे. सर्व स्तरातुन साक्षीचे कौतुक करण्यात येत आहे.