
सावंतवाडी : कोकणची समृद्ध कला-संस्कृती, निसर्गसंपन्न पर्यटन आणि जिभेवर रेंगाळणारी पारंपरिक खाद्यसंस्कृती यांचा अनोखा संगम असलेल्या 'लोक-सिंधू महोत्सव २०२६' चे आयोजन १३ ते १५ मार्च या कालावधीत सावंतवाडीत करण्यात आले आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स आणि माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव येथील माई इन्स्टिट्यूटच्या परिसरात हा भव्य सोहळा पार पडणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक पंढरी परब यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणे आणि स्थानिक पदार्थांना जागतिक ओळख मिळवून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. सावंतवाडी आणि जिल्ह्याची खाद्यसंस्कृती पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. यापूर्वी बेळगाव येथे घेतलेल्या कोकणी महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहता, आता मळगाव येथील तीन एकर परिसरात हा सोहळा होत आहे. येथील माई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या माध्यमातून प्रशिक्षित शेफ या महोत्सवात आपली कसब दाखवणार आहेत अशी माहिती श्री. परब यांनी दिली.
महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, १३ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री व आमदार दीपक केसरकर आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल. यात 'सिंधू सुंदरी' फॅशन शो, खेळ पैठणीचा, कराओके आणि नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात लहान मुलांसाठी 'मस्ती अँड मॅजिक', तर गृहिणी आणि तरुणांसाठी 'मॉकटेल्स, शेक्स, केक्स आणि कुकीज' बनवण्याचे विशेष वर्कशॉप्स आयोजित केले आहेत. शनिवारी 'देवधून' लाईव्ह बँडचा परफॉर्मन्स असेल, तर महोत्सवाच्या अंतिम दिवशी म्हणजेच १५ मार्चला राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र यांची भव्य लाईव्ह कॉन्सर्ट रसिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल. महोत्सवात उभारण्यात येणाऱ्या भव्य खाद्य जत्रेत कोकणी पदार्थांची मेजवानी असेल. तसेच, महिला बचत गट आणि स्थानिक व्यावसायिकांसाठी 'ग्राहक बाजार' अंतर्गत विशेष स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. काही विशेष कार्यशाळांसाठी प्रवेश मर्यादित असून, इच्छुक नागरिकांनी १२ मार्चपूर्वी आपली नावनोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील या सांस्कृतिक महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक पंढरी परब, सहाय्यक क्षेत्रीय व्यवस्थापक महेश तानावडे, सिनीयर एक्झिक्यूटिव्ह प्रविण प्रभू केळुस्कर, रिजनल मार्केटींग मॅनेजर साक्षी मयेकर, माई इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अनिरुद्ध दास, जयहिंद कॉलेजचे प्राचार्य अमेय महाजन आदी उपस्थित होते.










