आर्थिक देवाणघेवाणीतून राडा प्रकरण

मुख्य संशयिताला अटक
Edited by: विनायक गांवस
Published on: November 17, 2025 10:46 AM
views 172  views

सावंतवाडी : शहरातील सर्वोदय नगर परिसरात सुमारे साडे चार कोटी रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून दोन गटांमध्ये काही दिवसांपूर्वी  मोठा राडा झाला होता. या प्रकरणात सर्वोदय नगर येथे दोघांच्या अंगावर गाडी घालून फरारी झालेला मुख्य संशयिताला अंजुम राजगुरू (वय २४, राह. बांदा) याला आज रविवारी सायंकाळी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी अटक केली आहे.

शेअर मार्केट प्रकरणातून पुणे येथील गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा देण्यास विलंब झाल्याने, त्याबदल्यात आलिशान कार घेऊन जाण्यासाठी ते सावंतवाडीत आले होते. मात्र, संबंधित व्यक्तीने वेळेत फोन उचलला नाही, यातूनच वादाची ठिणगी पडली आणि हा सर्व प्रकार घडला. यादरम्यान, पुणे येथील संशयित आरोपींनी दिलेल्या तक्रारीनुसार, तला राजगुरू याने शौनक सपकाळ आणि अशोक ऊर्फ बाबू काकडे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घालून दुखापत केली. तसेच, इतरांनी मिळून शौनक सकपाळ, बॉबी काकडे, अतुल धीवरे, श्रीकांत कांबळे यांना मारहाण केली. या घटनेत अपहरण करणे, गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण आणि घरफोडी अशा गंभीर स्वरूपाचे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली किया  गाडी क्रमांक GA 03AF 4730 ही देखील पोलिसांनी गुन्ह्याकामी जप्त केली आहे.