
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर अर्ज भरण्यासाठी कणकवली तहसील कार्यालयात दाखल झाले. तत्पूर्वी येथील उबाठा शिवसेना कार्यालय ते तहसील कार्यालय अशी शहर विकास आघाडीतर्फे पायी रॅली काढण्यात आली. यावेळी शहर विकास आघाडीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
विशेष म्हणजे संदेश पारकर अर्ज भरत असताना त्यांच्या समवेत शिंदे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार राजन तेली, शिंदे शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी नागेश मोरये यांचीह उपस्थिती लक्षणीय ठरली. साहजिकच या शहर विकास आघाडीमध्ये उबाठा शिवसेनेसह, शिंदे शिवसेना, काँग्रेस यांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले.
संदेश पारकर यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळच्या सुमारास कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभूचे दर्शन घेतले. त्यानंतर पारकर यांनी भालचंद्र महाराज संस्थानात भेट देऊन दर्शन घेतले. पुढे श्री. पारकर उबाठा शिवसेना कार्यालयात दाखल झाले. तेथूनच शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते व पारकर समर्थकांनी जल्लोष करत तहसील कार्यालयापर्यंत पायी रॅली काढली. रॅलीमध्ये शहर विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारही उपस्थित होते.










