आम्ही भाजपातच, रविंद्र चव्हाणांवर आमचा विश्वास

आमचे नेते विशाल परब : मयुर लाखे
Edited by: विनायक गांवस
Published on: October 27, 2025 19:14 PM
views 271  views

सावंतवाडी : लाखे बांधवांना पुन्हा घरे बांधून देणार असे सांगून आमदार दीपक केसरकर यांनी आश्वासन पुर्ण केलं नाही. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला दोन एकर जमीन घरांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. ओसरगावला जमीनीही दिलीय. पण, शहरालगतची मागणी आम्ही केलीय. निश्चितच ते आम्हाला जागा देणार असून विशाल परब १०० घर बांधून देणार आहेत. त्यामुळे आम्ही भाजपसोबत असून रवींद्र चव्हाण आणि विशाल परब आमचे नेते आहेत. २०० हून अधिक लाखे बांधव भाजप सोबत असून केवळ पाच-पन्नास लोक दीपक केसरकर यांच्यासोबत आहेत असा खुलासा मयुर लाखे यांनी केला. तर शिवसेनेचा तो स्टंट होता असा आरोप केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

भारतीय जनता पार्टीमध्ये लाखे बांधवांनी प्रवेश केल्यानंतर काही तासातच लाखे बांधवांनी आम्ही दीपक केसरकर यांच्यासोबतच मरेपर्यंत राहणार असे सांगून आम्हाला फसवून भाजप प्रवेश दाखवला असे सांगितले होते. तसेच या प्रवेशावर संजू परब यांनीही पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली होती. याबाबत आज पुन्हा एकदा लाखे बांधवांनी एकत्र येत आपली भूमिका मांडली. यावेळी लाखे बांधव तथा कोल्हाटी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर लाखे म्हणाले, सावंतवाडी सर्वच लाखे बांधव दीपक केसरकरांसोबत नाहीत. काही पाच-पन्नास लोकच त्यांच्या सोबत आहेत. उर्वरित लाखे बांधव हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत. आम्ही रवींद्र चव्हाण आणि विशाल परब यांच्यासोबत काम करत आहोत. भविष्यातही आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. कारण, आज लाखे बांधवांना शहरात राहण्याची मुश्किल झाली आहे. दहा बाय दहाच्या घरात किती लोक राहणार ? हा प्रश्न असून दीपक केसरकर यांनी आम्हाला घरे बांधून देतो असे सांगून 

आश्वासन पूर्ण केलं नाही. मात्र, रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला दोन एकर जमीन घरांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी  आम्हाला जमिनीही देऊ केली होती. परंतु, त्या ठिकाणी जाणे खूपच लांब असल्याने आम्ही दुसरीकडे जमीन देण्याची विनंती त्यांच्याकडे केली आहे. शिवसेनेन घेतलेल प्रेस ही स्टंटबाजी आहे. लाखे बांधवांना त्यांनी बोलायला भाग पाडले. परंतु अर्धे अधिक लाखे बांधव हे भाजपसोबत असून केवळ पाच-पन्नास लोकच ही दीपक केसरकर यांच्यासोबत आहेत. काही झाले तरी आम्ही रवींद्र चव्हाण आणि विशाल परब यांच्यासोबत शेवटपर्यंत ठाम राहणार आहोत असं मत व्यक्त केले. यावेळी परशुराम चलवाडी, सोनप्पा लाखे, रामू पाटील, चंद्रकांत खोरागडे, निलिमा चलवाडी, गोपी लाखे, भरत लाखे आदींसह लाखे बांधव उपस्थित होते.