
कुडाळ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांवर शिवसेनेचा (शिंदे गट) भगवा फडकेल, असा ठाम दावा आमदार निलेश राणे यांनी केला आहे. ५० पैकी ३२ जागांवर आपला अधिकार असून, नारायण राणे यांच्या विचारांची सत्ता जिल्हा परिषदेवर कायम ठेवणार असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद/नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप (भाजप) आणि शिवसेना (शिंदे गट) आमने-सामने येणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
पावशी येथील एका मेळाव्यात बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, "५० पैकी ३२ जागांवर आमचा अधिकार आहे. त्यामुळे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समितीवर भगवा फडकेल यात काही शंका नाही. उमेदवार कोणताही असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे."
ते पुढे म्हणाले, "१००% सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार आणि नारायण राणे यांना अपेक्षित असलेला कारभार करणार. कारण २७ वर्षांपेक्षा जास्त काळ नारायण राणेंच्या विचारसरणीची जिल्हा परिषद सिंधुदुर्गवर सत्ता आहे. शिवसेनेचे दोन आमदार आहेत आणि आम्ही ३२ जागांवर थेट दावा करत आहोत."
आमदार निलेश राणे यांनी थेट ३२ जागांवर दावा केल्यामुळे, राज्यात एकत्र असलेल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये (शिंदे गट) सिंधुदुर्गच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.










